पंढरपूर - नक्षलग्रस्त भागात सेवेच्या कालावधीत उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाव्दारे पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना तर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक किरण अवचर आणि पोलीस निरिक्षक प्रशांत भस्मे यांना आंतरिक सेवा सुरक्षा पदक नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यामुळे एकाचवेळी पंढरपुरातील तीन पोलिस अधिकारी केंंद्र शासनाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत आंतरिक सुरक्षा व्यवस्थेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आणि पोलीस निरिक्षक किरण अवचर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली व चार्मोशी या नक्षलग्रस्त भागात मार्च २०१४ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत तसेच पोलीस निरिक्षक प्रशांत भस्मे यांनी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात जुलै २०१५ ते जुन २०१८ या कालावधीत तसेच पोलीस नाईक अनुरथ घोडके यांनी नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाव्दारे हे पदक जाहिर केले आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक नक्षलविरोधी अभियानांचे नेतृत्व केले. त्यामध्ये आंतरराज्य नक्षलविरोधी अभियान तसेच जहाल नक्षलवाद्यांचे मतपरिवर्तन करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.

सुरक्षा अभियान राबविताना मृत पावलेल्या नक्षलवाद्यांच्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ.सागर कवडे यांनी "प्रकल्प अग्निपंख" अभियान सुरु केले होते. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागात वाचन संस्कृती रुजविण्या साठी प्रोजेक्ट ज्ञानगंगा,आत्मसमर्पित नक्षल वाद्यांचे विचार बदलण्यासाठी महात्मा गांधी विचारधन परीक्षा,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सामाजिक सद्भाव परीक्षा असे विविध उपक्रम राबविले.यापूर्वीही नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्या मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदकविशेष सेवा पदकाने डॉ.सागर कवडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
Top