सोलापूर,दि.१२/०६/२०२०-कोरोना विषाणू मुळे जनतेची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय रिझर्व्ह बैंकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शासकीय, खाजगी बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था यांनी ३१ ऑगस्टपर्यंत कर्ज वसुली करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले.

     जिल्ह्यात बँका, पतसंस्था,वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.या पार्श्वभूमीवर आयोजित सर्व बँकांचे प्रतिनिधी,वित्तीय संस्था प्रतिनिधी, कर्जदार, लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते.

    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख,जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

    बैठकीत कर्जदारांनी गाऱ्हाणी मांडली. यावर श्री शंभरकर यांनी सांगितले की,बँकांनी कर्ज दारांना वसुलीसाठी दमदाटी करू नये. त्यांना तगादा लावू. जबरदस्तीने वसुली करू नका. दंड, व्याज,आगाऊ व्याज भरून घेऊ नका अन्यथा कारवाई करण्यात येईल. 

       बँकांनी कर्जाच्या परतफेडीबाबत ग्राहकांना माहिती द्यावी, सोशल मीडिया किंवा माध्यमातून प्रबोधन करावे. जे ग्राहक स्वतःहून पैसे भरत असतील तरच भरून घ्या, असेही त्यांनी सांगितले. याबाबत भारतीय रिझर्व्ह बैंकेने कर्ज वसुलीबाबत निर्देश जारी केले आहेत. याबाबत कोणत्याही ग्राहकांना काही तक्रार असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक 18001021080 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
Top