नातेपुते ,(श्रीकांत बाविस्कर) - मोरोची(ता. माळशिरस, जि. सोलापूर ) येथील एका शेतकरी कुटुंबातील हरीश सुळ यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्याने त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल मोराची गावात आनंद व्यक्त करण्यात आला.


   हरीशचे प्राथमिक शिक्षण मोरोची गावात झाले. बारावीचे शिक्षण पुणे जिल्ह्यात झाले असून घरची परिस्थिती बेताचीच आहे.घरात प्रशासकीय सेवेचा कोणताही वारसा नाही.सतत अभ्यास व कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्यामुळे जिद्द व चिकाटीच्या जोरावर देशांमध्ये २२ वा क्रमांक पटकावला . 


  यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेले हरीश सूळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, अपयशाने मी खचून गेलो नाही. स्वतः तील उणिवा शोधल्या, त्यावर मात केली. मागील चुका दुरुस्त केल्या. राज्यात २२व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. 

   बीई मेकॅनिकेलची अभियांत्रिकी पदवी पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील महाविद्यालयात पूर्ण केली. त्यानंतर त्यांना एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली पण ही नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पाच वेळा दिल्या.तीन मुलाखती दिल्या, दरवेळी यशाने थोडक्यात हुलकावणी दिली मात्र,अपयशाने मी खचून गेलो नाही.कमी काळ पण जास्त गुणवत्ता पुर्ण अभ्यास करण्यावर भर दिला. दररोज ८-१० तास न चुकता अध्ययन केले. 

   मोरोची गावातील पहिले प्रशासकीय अधिकारी हरीश सुळ यांची उपजिल्हाधिकारी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा व त्यांचे वडील मोहन सुळ यांचा ग्रामस्थांच्यावतीने जि.प.सदस्य राहुल वाघमोडे , राहुल सुळ, मोराची गावचे सरपंच पिंटू वावरे, उपसरपंच माऊली सुळ,दत्तात्रय छगनराव माने, अर्जुन सुळ ,सचिन सुळ,दादा सुळ,विठ्ठल सुळ, निलेश सुळ तसेच सर्व मोरोची गावचे ग्रामस्थ व सुळ पाटील परिवार उपस्थित होते.
 
Top