पंढरपूर,(प्रतिनिधी),दि.१८ - गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून जगभरात कोविड- १९ (कोरोना) या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारने संपूर्ण देशात व राज्यात टाळे बंदी जाहीर केल्यामुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले. छोट्या व्यापार्‍यांचे,हातावर पोट असणार्‍यांचे खूप हाल या टाळेबंदीने झाले आहेत.या व्यापार्‍यांना त्यांच्या अडचणींच्या काळात हातभार लागावा, व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध व्हावे या हेतुने निशिगंधा बँकेने "कोविड-१९" ही कर्ज योजना आणली आहे. सदर योजनेंतर्गत पात्र छोटया व्यापार्‍यांना रू.२५००० ते ५०००० पर्यंतचे कर्ज सुलभ पध्दतीने मिळू शकते. या व्यापार्‍यांना व्यवसाय उभा करणेसाठी कालावधी मिळावा म्हणून सुरूवातीचे तीन महिने हप्ता न भरण्याची सवलत देण्यात येणार आहे व तीन महिन्यानंतर सदर कर्जासाठी हप्ता वसुली सुरू होणार आहे. या कर्जाचा हप्ता बँकेच्या प्रतिनिधीमार्फत दुकानी /घरी येऊन पिग्मी व्दारे अथवा समक्ष बँकेत देखील स्विकारण्याची सोय करण्यात आलेली आहे. सर्व पुर्तता झालेपासून जास्तीत जास्त ३ दिवसांत सदरच्या कर्जाची रक्कम सबंधिताच्या हातात पडेल अशी सोय करण्यात आलेली आहे, तरी सर्व गरजूंनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले आहे.
 
Top