पंढरपूर - कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध नियंत्रणासाठी आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मठ आणि धर्मशाळांमध्ये बाहेरील वारकरी आणि नागरिक वास्तव्यास असता कामा नये . जर विनापरवाना कोणी नागरिक पंढरपुरात वास्तव्य करीत असतील तर संबंधित मठ चालक आणि धर्मशाळा यांनी तात्काळ प्रशासनास तशी माहिती कळवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपुरातील कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोग प्रतिबंध नियंत्रणासाठी आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे.मठ आणि धर्मशाळा यांना नोटीसा बजावल्या आहेत. या आदेशान्वये राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिक, साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय मठ व्यवस्थापक आणि धर्मशाळा व्यवस्थापक यांनी वास्तव्यास ठेवू नये. तसेच मठांच्या व धर्मशाळेच्या संख्येची व नागरिकांची नोंदणी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी स्वत: जवळ ठेवावी. तसेच विनापरवानगी कोणताही नागरीक आढळून आल्यास त्यांचावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले आहे.

यात्रा कालावधीत शहरातील व ग्रामीण भागातील ४५० मठाधिपतींना नोटीसा काढल्यास याची माहिती उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली आहे.आषाढी यात्रा सोहळा एक महिन्यांवर आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर व हद्द भागामध्ये असलेल्या सर्व लहान मोठे मठ, वारकर्याना भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या खाजगी इमारती यांचे सर्वेक्षण केले आहे. सद्य स्थितीत त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे नागरिक, साधकांची नावे संकलित करण्यात आली आहेत.सर्व लहान मोठे मठांचे व्यवस्थापक,वारकर्यांना भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. राज्यातील व जिल्ह्यातील, परराज्यातून येणाऱ्या नागरिक साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या पूर्वपरवानगी शिवाय वास्तव्यास ठेवता येणार नाही.जर तसे वास्तव्यास ठेवल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पत्र उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली आहेत .
 
Top