कोविड- 19 अर्थात कोरोनाच्या वाढत्या संसर्गानं जगभरात अस्वस्थता आहे. पण याचा सर्वाधिक फटका बसलाय तो गरीब, वंचित घटकांना. समाजातील या 'नाही रे' वर्गाचे केवळ कोरोनाच्या साथीनेच नाही तर, लॉकडाऊननेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानात हातचा रोजगार जाणे, पैशांची चणचण, आरोग्याची हेळसांड, शैक्षणिक नुकसान असे अनेक कंगोरे आहेत.अशा स्वरूपाच्या समस्यांवर दीर्घकाळापासून काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना एकत्र बोलावून, त्यांच्याद्वारे सरकारला काही ठोस उपाययोजना सुचवाव्यात असे आमच्या मनात आले. म्हणूनच महाराष्ट्र विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनाआधी वंचितांच्या समस्यांवर चर्चा करून, महाराष्ट्र सरकारला ठोस कृतिकार्यक्रम सुचविण्यासाठी आम्ही 'महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांचे ऑनलाईन अधिवेशन' भरवतोय. 'संपर्क संस्था' आणि 'नवी उमेद' फेसबुक पेजद्वारे आयोजित करण्यात आलेले, हे 'संपर्कसेतू अधिवेशन' दि.१२ आणि १३ जून २०२० रोजी होणार आहे. विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली हे 'संपर्कसेतू' अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे . 'नवी उमेद' आणि 'संपर्क'च्या फेसबुक पेजवर हे अधिवेशन दि.१२ आणि १३ जून रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात लाईव्ह पाहण्यास उपलब्ध होणार आहे . 

    यात प्रामुख्याने ग्रामीण आणि नागरी समस्या, रोजगाराचे प्रश्न,महिला बालविकास आणि सामाजिक न्याय संबंधातील प्रश्न तसेच आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्या या विषयांवर सखोल चर्चा आणि प्रश्नोत्तरे होतील. या ऑनलाईन अधिवेशनाचे आयोजक 'संपर्क' संस्थेच्या मेधा कुलकर्णी, 'प्रथम' च्या फरिदा लांबे , स्वयंसेवी संस्थांचे सल्लागार मिनार पिंपळे हे आहेत. या अधिवेशनाचे निमंत्रक 'संपर्क' संस्थेच्या मृणालिनी जोग तसेच 'नवी उमेद' हे फेसबुक पेज आहे. या अधिवेशनात तज्ज्ञ मार्गदर्शकांसह महाराष्ट्रातील १०० हून जास्त स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही हजर असतील.
 
Top