पंढरपूर - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.हा व्हायरस तीव्र संसर्ग स्वरूपाचा असल्याने महाराष्ट्रमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने १७/०३/२०२० ते ३१/०५/२०२० या कालावधीत भाविकांना विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे .तथापि केंद्र शासनाने ३०/०६/२०२० पर्यंत संपूर्ण देशभरात लाँकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर शहरात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

   तसेच दि. ३१/०५/२०२० रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे ३०/०६/२०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बाबी विचारात घेता मंदिरे समितीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दि ३०/०६/२०२०पर्यंत भाविकांना दर्शना साठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेची संबंधित आहे त्यामुळे श्रींचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे वेळेच्या वेळी हजारो वर्षांची प्रथा व परंपरा यांची सांगड घालून करणे आवश्यक आहे. कामातील त्रुटी यामुळे भाविकांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घेणे आवश्यक आहे.तसेच वारकरी संप्रदायाचे श्रींच्या नित्योपचाराबरोबर अन्य प्रथा परंपरा यावर कटाक्षाने लक्ष असते ही बाब विचारात घेता पहाटे होणारी श्रींची काकड आरती,नित्य पूजा, महा नैवेद्य,पोशाख,धुपारती व शेजारती इथेपर्यंत सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदन ऊटी पूजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत. इतर सणवार व उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे .

सदरचे पत्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती , पंढरपूरचे सर्व सदस्य यांच्याशी विचार विनिमय करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी हे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
 
Top