पंढरपूर - बहुजन समाज पार्टीच्यावतीने गट विकास अधिकारी, पंचायत समिती रविकिरण घोडके यांच्याकडे १५ टक्के निधी संदर्भात लिखित स्वरूपात निवेदन सादर करण्यात आले. पंढरपूर तालुक्या अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना १५ टक्के निधी अनुसूचित जाती,जमातीच्या व्यक्तींना वैयक्तिक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत. तरी ही ग्रामपंचायत स्तरावर सदर आदेशाचे पालन होताना दिसत नाही, सदर आदेशाचे काटेकोर पालन करावे व अनुसूचित जाती जमाती तसेच अपंग व्यक्तींना निर्धारित केलेला निधी तत्काळ जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात वितरित करण्यात यावा, अशा स्वरूपाचे निवेदन गटविकास अधिकारी, पंढरपूर यांचेकडे देण्यात आले आहे. सदर आदेशानुसार पंढरपूर  तालुक्यातील प्रत्येक खेडे गावातील अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या संदर्भात पुढील कारवाई सुरू असल्याचे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर यांनी सांगितले आहे .

    बहुजन समाज पार्टी पंढरपूर माध्यमातून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती विभागातील कार्यकर्त्यांनी संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून अनुसूचित जाती , जमाती व अपंग लोकांसाठी निर्धारित केलेल्या निधीचा योग्यप्रकारे पाठपुरवा ग्रामसेवकाच्या माध्यमातून करावा व नागरिकास मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तू मिळणे संदर्भात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करावेत अशा स्वरूपाचे आवाहन बहुजन समाज पार्टी, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष रवी सर्वगोड, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे, शहराध्यक्ष मनोज वनसाळे यांनी केले आहे.
 
Top