विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल

मुंबई दि ७:  कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करूत असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता ,आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले. ते आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यां समवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते.

    यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्या बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते. 

      उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरु आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाही कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरु आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. २५ हजार मेट्रिक टन ज्वारी आणि १५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही सुचना केल्या.आपली अर्थव्यवस्था सुरु करताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत.आमच्याकडून राजकारण होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

  विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की उपचार न झाल्याने रुग्णांचा मृत्यू होत असेल तर ते चुकीचे आहे.कोरोनाची चाचणी रुग्ण मरण पावल्यावर येतेय.क्वारंटाईटन केंद्रांमध्ये अधिक सुविधा द्याव्यात. 

    मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की,कंटेनमेंट झोन्सच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे लागेल . पोलीस थकले आहेत. त्यामुळे एसआरपी फौज आवश्यक आहे.पोलिसांना लोकही गृहीत धरताहेत.अनेक ठिकाणी छोटे दवाखाने बंद आहेत. रुग्णांचे हाल होत आहेत. ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण अडकेल आहेत त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था व्हावी. 

शेकापचे जयंत पाटील ,बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर , वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ,एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील,माकपाचे अशोक ढवळे,भाकप चे प्रकाश रेड्डी ,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे ,राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रिपाईचे डॉ. राजेंद्र गवई, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे यांनीही आपल्या सुचना मांडल्या आणि आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत अशी ग्वाहीही दिली. 
 
Top