पंढरपूर - संपूर्ण देशभरात कोरोनाच्या विरोधा तील लढाईत आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होऊन लढा देत आहेत.त्यांच्याप्रति संपूर्ण देशात कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विशेष विमा कवच देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे.याबाबत काही विभागा तील जसे कि आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे फॉर्म भरून घेतले गेले आहेत. मात्र अनेक ठिकाणी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी,औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक ,वाहन चालक ,परिचर,अर्धवेळ परिचर यांचे कोविड १९ विमा संरक्षण फॉर्म भरून घेतले गेले नाहीत.तरी सदर फॉर्म तातडीने भरून घेतले जावेत अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.             

  याबाबत अधिक माहिती देताना संभाजी शिंदे म्हणाले कि,सोलापूर शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.सदर उपरोल्लेखित आरोग्य कर्मचारी यांचा कोरोनाच्या रुग्णांशी थेट संपर्क येण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळावे यासाठी हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया तातडीने पार पाडणे गरजेचे झाले आहे .यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहोत.
 
Top