पंढरपूर, ता.१९/०५/२०२०- ग्रामीण संस्कृतीमध्ये तमाशाचे महत्व मोठे होते. कालोघात तमाशाचे महत्व कमी होऊ लागले आहे.अशा कठीण प्रसंगातही मेंढापूर ,ता.पंढरपूर सारख्या ग्रामीण भागातील काही कलावंतांनी तमाशा लोककला जिवंत ठेवली आहे. केवळ तमाशा लोक कलेवर आपली गुजराण करणाऱ्या कलावंतांची येथे संख्या मोठी आहे.


दूरचित्रवाणीवर सुरु असलेल्या विविध मालिका, करमणूक करणारे कार्यक्रम यामुळे तमाशाला उतरती कळा लागली आहे. त्यातच आता कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी तमाशा फडात घुंगराचा आवाज खणणाला नाही. त्यामुळे केवळ कलेवर पोट भरणाऱ्या तमाशा कलवांचे हाल सुरु आहेत.


अशावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज मेंढापूर येथील तमाशा कलावंताना गहू,तांदुळ,साखर आदींसह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले. येथील सरपंच दिलीप कोरके यांच्या हस्ते मदतीचे वाटप केले.

यावर्षी कोरोनामुळे चैत्र आणि वैशाख महिन्यात होणाऱ्या गावोगावच्या जत्रा,यात्रा रद्द झाल्यामुळे जत्रांच्या निमित्ताने होणारे तमाशाचे फड देखील यंदा झाले नाहीत. यावर्षी पाऊस पाणी चांगला झाला होता. सर्वत्र सुखाचे समाधानाचे वातावरण होेते. चांगले पैसे मिळतील म्हणून तमाशा फड मालकांनी मोठी गुुंतवणूक केली. ऐनवेळी कोरोनाचे सावट आले आणि तमाशाचे कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे केवळ कलेवर पोट भरणाऱ्या तमाशा कलावंताचे हाल झाले.

ग्रामीण भागातील तमाशा कलावंतांना आधार म्हणून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,उपसरपंच बबन पाटोळे,तलाठी दादासाहेब पाटोळे, ग्रामसेवक सोमनाथ हडपे ,दाजी शिंदे, शाहीर नंदकुमार पाटोळे,मारुती सुतार,समाधान डुबल आदी उपस्थित होते.
 
Top