नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)-सध्या सर्वत्र कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत .या अनुषंगाने नातेपुते येथे पोलीस आणि नागरिक यांच्या अडचणी समजावून घेण्यास संदर्भात नातेपुते येथे सोलापूरचे ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी भेट दिली.या भेटी दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


यावेळी बोलताना सोलापूरचे ग्रामीण पोलीस अप्पर अधिक्षक अतुल झेंडे म्हणाले की ,माळशिरस तालुका हा कोरणा मुक्त आहे याचे सर्व श्रेय पोलीस नागरिक व प्रशासन यांच्या सहकार्यामुळे झाले आहे आत्ता पर्यंत नागरिकांनी जशी साथ दिली आहे इथून पुढे दिली तर निश्चितच आपण कोरोना थांबवू शकू तसेच माळशिरस तालुक्यातील जनतेचे त्यांनी अभिनंदन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की पंचेचाळीस दिवसापासून पोलीस बांधव रस्त्यावर आहे पोलिसांवर ताण वाढत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये २४०० पोलीस व १५० अधिकारी मनुष्यबळ आहे. पोलिसांवर वाढत्या ताणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी होमिओपॅथी औषध, क्लोरोक्वीन, मल्टीविटामिनच्या गोळ्या तसेच चवनप्राश दिले जाणार आहे. सध्या ९९ टक्के लोकांनी सहकार्य केले असून एक टक्का लोकांमुळे घटना घडत आहेत. अशांवर पोलीस कारवाई करत आहेत.सध्या बेशिस्तपणा,नियम तोडणाऱ्या वर बाराशे गुन्हे दाखल केले असून १२ ते १३हजार गाड्या जप्त केल्या आहेत. पोलीस, आरोग्य कर्मचारी व इतर covid- वॉरिअर यांच काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळले पाहिजे.

   नवीन आदेशानुसार दुकाने सुरू होतील परंतु दुकानदाराने नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच दुकान ही बंद केले जाईल. ते म्हणाले की दारूची दुकाने कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार नाहीत. तसेच जनतेनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. 

   यावेळी डी.वाय.एस.पी नीरज कुमार राजगुरू, नातेपुते पोलिस स्टेशनचे ए.पी.आय युवराज खाडे, पोलीस नाईक शिवकुमार मदभावी, विशाल घाडगे सह कर्मचारी वर्ग पत्रकार उपस्थित होते.

  त्यानंतर पोलीस बांधवांच्या अडचणी समजून घेतल्या तसेच शिंगणापूर येथील फिक्स पॉईंट वर यांनी भेट देऊन त्यांच्या वैयक्तिक व कामातील अडचणी समजावून घेतल्या व त्यांना त्याबाबत मार्गदर्शन केले.
 
Top