*बारडी, ता पंढरपूर येथील वन क्षेत्रातील वन्य जिवांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून चारा व पाण्याची सोय......

मंगळवार, दिनांक ०५ मे ,२०२०- सद्या वनांमध्ये आता भुकेल्या गाईंना / जनावरांना चारा व वन्य जीवांना पाणी उपलब्ध नाही.

     कोरोना व्हायरसचा पादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्याने दिनांक १७ मार्च,२०२० पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून पंढरपूर शहर व परिसरात अडकून राहिलेल्या मजूर व निराधार नागरिकांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीच्या वतीने दररोज ३००० फूड पॅकेट देण्यात येत आहेत.

      यातच मध्यतरीच्या काळात अशी बाब निदर्शनास आली की, शहरात अंदाजे ६० जनावरे अशी आहेत की,ती दान दिलेल्या चाऱ्यावर उपजीविका करत होते. परंतु लॉकडाउनमुळे त्यांना कोणीच चारा उपलब्ध करून देऊ शकत  नाही. त्यामुळे या मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मंदिर समितीने ५५०० ते ६००० रुपयांचा चारा गेल्या १० दिवसापासून देण्याचा  उपक्रम सुरू केला आहे.

 बार्डी तालुका पंढरपूर येथील वन क्षेत्रामध्ये ३०० पेक्षा जास्त गाई व २०० पेक्षा जास्त हरीण, काळवीट व इतर वन्यजीव आहेत.दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या वन्यजीवांना विविध स्वयंसेवी संस्थेकडून चारा पुरवठ्याचे काम केले जात होते. परंतु कोरोनाचा पादुर्भाव वाढल्याने अनेक गोष्टीवर निर्बंध आल्याने या स्वयंसेवी संस्थांनी इकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या वन्यजीवाचा खास करून गाईचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी मंदिर समितीकडे या जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था करावी अशी आग्रहाची मागणी केली होती.

        त्यानंतर सदस्य ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सदर ठिकाणी सक्षम भेट दिली व वस्तुस्थितीची पाहणी केली.त्यामध्ये अंदाजे ३०० हून अधिक गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. 

      त्यानंतर सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर सर्व सदस्यांशी चर्चा करून या वन्य प्राण्यांना मंदिर समितीने वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिला टप्पा म्हणून काल दि ४ मे २०२० रोजी २५०० पेंडी देशी कडबा या वन क्षेत्राजवळ श्री सुखदेव महाराज मठात ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे दररोज १५० ते २०० पेंडी चारा या वन्य जीवांना देण्यास आजपासून सुरुवात केली आहे.तसेच दर दोन दिवसांनी २५००० लिटर पाणी टँकरद्वारे पाठवून तेथील पाण्याची टाक्या व पाणवठे भरून घेण्यात येत आहेत. जेणेकरून या तहानलेल्या जीवांना पाणी वेळेत उपलब्ध होईल अशी माहिती विठ्ठल जोशी,कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांनी दिली आहे. 
 
Top