नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)-कोरोना विषाणुच्या संसर्गाने उग्र रूप धारण केल्यामुळे महाराष्ट्र शासन या महारोगाला प्रतिबंध करणेसाठी वेगवेगळया यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे.
यामध्ये ग्रामीण भागातील पोलीस पाटलांची फार महत्वाची भुमिका आहे .शहरी भागातील अनेक कुटुंबे कोरोनाचे दहशतीने आपले गावोगावी परत आली आहेत. त्यामुळे गावपातळीवर कार्यरत असलेल्या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे .पोलीस पाटलांना गावातील प्रत्येक वाडया वस्त्यावर प्रत्येक उंब-यापर्यंत लक्ष द्यावे लागते प्रत्येक ठिकाणी प्रशासन पोहचत नसलेने पोलीस पाटलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते काही ठिकाणी ग्रामस्थांचा विरोधपण सहन करावा लागत आहे . 

   शासनाने ग्रामस्तरावर कोरोनाशी मुकाबला करणेसाठी आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसुल विभाग, पंचायत समिति व पोलीस पाटील यांची समिती नेमलेली आहे परंतु बाकीचे विभाग व पोलीस पाटील यांची तुलना करताना तुटपुंज्या पगारात गावामध्ये  कायदा सुव्यवस्था व शांतता राखणेची जबाबदारी असलेल्या पोलीस पाटलावर जास्त जबाबदा-या वाढल्या आहेत . वास्तवीक पोलीस पाटील गाव पातळीवर थेट जनतेपर्यंत जाऊन काम करित असताना त्यांना चांगल्या दर्जाचे आरोग्य किट आणि त्यांचा विमा करणे आवश्यक आहे 
      
   या सर्व बाबींचा विचार करून राज्यातील सर्व पोलीस पाटलांना चांगल्या दर्जाचे आरोग्य किट देणेत यावे व इतर कोरोना योद्धयाप्रमाणे पोलीस पाटील यांचा ५० लाखांचा आरोग्य विमा जाहीर करावा व सर्व पोलीस पाटलांना मागील थकित व  तीन महीन्याचे अतिरिक्त वेतन देऊन न्याय द्यावा असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,  सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्ता् भरणे यांना डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी ई-मेलद्वारे निवेदन दिले आहे.
 
Top