दि.१७ मे रोजी पुण्यतिथीदिनी पत्रकारांनी ‘बाळशास्त्रीं’ना घरातूनच अभिवादन करावे- रविंद्र बेडकिहाळ
फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने प्रतीवर्षीप्रमाणे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची १७४ वी पुण्यतिथी व सन २०१९ च्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण असा संयुक्त कार्यक्रम दिनांक १७ मे २०२० रोजी ‘दर्पण’ कारांच्या जन्मगावी,पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील ‘दर्पण’ सभागृहात पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे - देऊळवाडी ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय यांच्या
सहकार्याने आयोजित केला होता. 

    तथापि, ‘कोरोना’ या जीवघेण्या साथीमुळे सदर कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे. 

  दिनांक १७ मे रोजी बाळशास्त्री जांभेकरांना पुण्यतिथीनिमित्त राज्यातील संपादक, पत्रकारांनी आपल्या घरात अथवा कार्यालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करावे,असे
आवाहनही रविंद्र बेडकिहाळ, संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी केले आहे.

    ‘कोरोना’मुळे निर्माण झालेली आरोग्यविषयक परिस्थिती दूर झाल्यानंतर आणि महाराष्ट्र शासनाने कार्यक्रम घेण्याबाबत परवानगी दिल्यानंतरच ‘दर्पण’ पुरस्कार वितरण समारंभ पूर्वसूचना देवून पोंभुर्ले, ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग येथील ‘दर्पण’ सभागृहात आयोजित करण्यात येईल, असेही
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
Top