पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने सर्व स्थलांतरित कामगार आणि इतर नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी रेल्वे रुळावरून चालू नये,असे आवाहन केले आहे.भारतीय रेल्वेने सर्व स्थलांतरित कामगारांना संयम राखण्याचे तसेच रेल्वे रुळा वरून न चालण्याचे किंवा रेल्वे रुळावर आराम करू नये, असे आवाहन केले आहे, कारण हे अत्यंत धोकादायक तर आहेच, तसेच रेल्वे कायद्यांतर्गत हे प्रतिबंधित देखील आहे.

     सर्व स्थलांतरीत कामगार ज्यांना आपल्या राज्यात परत जायचे आहे,त्यांनी नजीकच्या जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करून अर्ज करावा, जेणेकरून त्यांना श्रमिक विशेष ट्रेनने त्यांच्या इच्छित स्थळी पाठवता येईल.अडकलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे तसेच भारतीय रेल्वेच्या इतर विभागांमध्ये श्रमिक विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जात आहेत.१० मे २०२०, दुपारी ३ वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार देशभरातील विविध राज्यांमधून एकूण ३६६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या आहेत. यापैकी २८७ आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्या असून ७९ गाड्यांचा प्रवास सुरु आहे.

 लॉकडाऊनमुळे नियमित प्रवासी रेल्वेसेवा स्थगित राहिली असली तरी देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी मालगाड्या व विशेष पार्सल गाड्या चालू ठेवल्या आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली आहे. वर नमूद केलेल्या श्रमिक रेल्वे गाड्यां व्यतिरिक्त मालगाड्या व विशेष पार्सल गाड्या चालविल्या जात आहेत. याशिवाय, भारतीय रेल्वेने १२ मे २०२० पासून हळूहळू प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना जाहीर केली असून, सुरुवातीला १५ मार्गावरील सेवा सुरू होतील (३० रिटर्न फेऱ्या) असे रेल्वेने प्रसिद्धीस दिले आहे अशी माहिती रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील आपत्ती व सुरक्षा तज्ञ यांनी दिली आहे. 
 
Top