पंढरपूर -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला.लॉकडाऊनच्या ४ थ्या टप्प्यात थोडी शिथिलता देण्यात आली.बाजारपेठा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . याच्या नियोजनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आली.

पंढरपूर नगरपालिकेने स्थानिक व्यापाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये लॉकडाऊन-३ संपेपर्यंत दुकाने न उघडण्याचा निर्णय झाला. मात्र यातही व्यापार्यांमध्ये मतभेद दिसून आले. काहींनी आरोप केला की आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आला तो आम्हाला मान्य नाही.ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तेच बंदमध्ये दुकानात जाऊन माल देताना सापडले त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे .

१८ मे पासून आता दुकाने उघडण्यासाठी नगर पालिकेने ए बी सी डी पॅटर्न तयार केला. मात्र हा पॅटर्न रद्द करुन सरसकट दुकाने सुरु ठेवण्याच्या सुचना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालकेंनी प्रशासनाला दिल्या आहेत. आमदार भारत भालके यांना नगरपालिका प्रशासनाने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांनी अटी शर्तींवर दुकाने उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एक किलोमीटर परिसरातील पाच दुकाने उघडण्याचे आदेश होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपालिकेला नियोजनाचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार पंढरपूर नगरपालिकेने ए बी सी डी पॅटर्न तयार केला.मात्र यावर काही व्यापाऱ्यांनी आक्षेप घेत अनेक दुकाने ही परस्परांवर अवलंबून आहेत त्यामुळे हे उद्योग एकाच दिवशी सुरु असावेत अशी मागणी आमदार भारत भालकेंकडे केली. तसेच या ए बी सी डी मध्ये वशीलेवाजी झाल्याची तक्रार देखिल केली होती.

ग्रामीण भागातून आलेली व्यक्ती एकाच दिवशी सगळी खरेदी करून जाईल. जर एका वस्तूचे दुकान बंद आणि दुसरे सुरु असे झाले तर वारंवार त्यांना शहरात यावे लागेल. त्यामुळे ठराविक वेळ ठरवून सरसकट दुकाने सुरु करण्याच्या सूचना आमदार भालकेंनी दिल्या आहेत.तसेच ही दुकाने सुरु करताना फिजिकल डिस्टंस, सॅनिटायझर आणि मास्क बंधनकारक असावे अशी सूचना ही त्यांनी केली. सरसकट दुकाने उघडली राहिल्यास जास्त गर्दी होणार नाही. तसेच नागरिक रोज एक वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने फिरणार नाहीत. त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी होईल असेही आमदार भारत भालके म्हणाले.

त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.केंद्र सरकारने लाँकडाऊन जाहीर केल्यापासून पंढरपूर नगरपालिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असल्या मुळे आज पंढरपूर शहर कोरोना मुक्त असल्याचे चित्र आहे. या चांगल्या कामाचे कौतुक करायला मोठे मन लागते ते जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीं यांच्याकडे नसल्यामुळेच नगर पालिका विकली गेली आहे असा गंभीर आरोप ते करीत आहेत .कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात राजकारण करू नका असे मुख्यमंत्री आव्हान करीत असतानाही लोकप्रतिनिधी मात्र जाणीवपूर्वक टीका करत असल्यासारखे दिसत आहे .नगरपरिषदेचा कारभार प्रथमपासूनच पारदर्शक लोकाभिमुख असल्यानेच आम्हाला लोकशाही मार्गाने सत्तेवर बसवले आहे. कोरोना सारख्या मोठ्या संकटात मतभेद बाजूला सारून प्रशासनास सहकार्य अपेक्षित असताना लोक प्रतिनिधी बिनबुडाचे आरोप करीत आहेत आणि याद्वारे सर्वसामान्य जनतेच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ,असेही या पत्रकात म्हटले आहे. सरकारने लाँक डाऊन जाहीर केल्यापासून नगरपालिकेने महसूल,आरोग्य आणि पोलीस विभाग यांच्या मदतीने शहरात विविध उपाय योजना राबविल्या आहेत. दोन वेळा शहर निर्जंतुकीकरण केले असून प्रत्येक दुकानांची फवारणी केली आहे. ९७ हजार नागरिकांची स्क्रीनिंग तपासणी पूर्ण झाली आहे.राज्यात सर्व प्रथम ऑक्सि मीटर तपासणी पंढरपूर नगर पालिकेने सुरू केली आहे तसेच शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे शहरात एबीसीडी असे दुकानांच्या वर्ग करण्यात आले आहेत.यामध्ये वशिलेबाजी झाले हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. शहरातील व्यापारपेठ देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन जात असल्याचा त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. पोलिस प्रशासनाच्या सूचनेवरून शेतीमाल व धान्यांची वाहने आल्यावरती निर्जंतुकीकरणा साठी बाजार समितीमध्ये उभे केले जातात. गर्दी टाळण्यासाठी बाजार समितीमध्ये वाहने जात असून त्यामध्येही लोकप्रतिनिधींना राजकारण दिसत आहे.सर्व विभागाचे अधिकारी आजी-माजी नगरसेवक, आमदार प्रशांत परिचारक यांच्या नियोजनामुळे आज शहर कोरोना मुक्त असून नागरिकांनी तेवढीच साथ दिली आहे. पंढरपूरचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून येथील नियोजनाचे अनुकरण इतर तालुक्यात सुरू आहे.
 वास्तविक लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला सोबत घेऊन संकटावर मात करणे अपेक्षित आहे मात्र लोकप्रतिनिधी बिनबुडाचे आरोप करून अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करत असल्याचाही आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. या पत्रकावर उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर आणि नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांच्या सह्या आहेत.
 
Top