खर्डी,(अमोल कुलकर्णी)-महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यातील काही तरुण उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी परराज्यात गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक तरुण हे सोने-चांदी यांच्या भट्टीमध्ये काम करणारे (आटणी) गलाई कामगार आहेत.

     पश्चिम बंगाल,केरळ,राजस्थान,गुजरात,आंध्र प्रदेशात महाराष्ट्रातील सातारा, सांगली,सोलापूर जिल्ह्यातून पाच ते दहा हजार तरूण या गलाई व्यवसायामध्ये काम करत आहेत. देशातील कोरोना या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. परंतु आशा संकटग्रस्त वेळी आपल्या मूळ गावी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी,गावी परतण्या साठी हे गलाई बांधव प्रयत्नशील आहेत.याचाच एक भाग म्हणून गलाई कामगार संघटनांचे खजिनदार बाळासाहेब विठ्ठल रोंगे(मूळ गाव खर्डी ता.पंढरपूर) यांनी कलकत्ता येथून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी सिल्व्हर ओक येथे दूरध्वनीवरून संवाद साधला.

यावेळी त्यांनी गलाई कामगारांना गावी येण्या साठी विशेष परवानगी द्यावी,अशी मागणी केली असता शरद पवार यांनी "मला माहिती आहे गलाई लोकांची,थोडा धीर धरा, याबाबत लवकरच केंद्र स्तरावरून निर्णय होईलच. वाट पहा, संयम सोडू नका!"असे सुचवले.त्यानंतर एक तासांनी खासदार शरद पवारांनी स्वतः बाळासाहेब रोंगे यांना फोन करून अधिक तपशील घेतला.

तसेच आता जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने परराज्यातून मूळ गावी येऊ शकतात. त्याचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या.मूळ गावी परत येणाऱ्या गलाई व्यावसायिक, कामगारांना आता थोडासा दिलासा मिळाला आहे.यावेळी पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनचे अध्यक्ष अजित शिंदे,खजिनदार बाळासो रोंगे,सूरज निकम,लक्ष्मण खंदारे,शहाजी पाटील,संजय दिघे,उत्तम जरे,राम चव्हाण,शहाजी जाधव, दत्तात्रय बुलबुले,महादेव जरे सह सर्व सदस्य उपस्थित होते.
 
Top