गडचिरोली - केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर परराज्यातील मजुरांना रेल्वेने त्यांच्या गावी परत पाठविण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्‍वासना नुसार राज्यांतर्गतही परजिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींची ने-आणही सुरू होत आहे.लॉकडाऊन काळात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना आपापल्या गावी सोडण्या साठी शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मदत आणि पुनर्वसन विभागाकडून आवश्‍यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत १० हजार बसेसद्वारे संचारबंदीमुळे अडकलेले नागरिक आपापल्या जिल्ह्यात जातील. याबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली. 

   मुंबई पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांत अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा सर्वांना पुढील चार पाच दिवसांत आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याबाबतचे नियोजन, संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, प्रवाशांना तपासण्याचे काम, आवश्‍यकता पडल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणाचे काम याबाबत सविस्तर चर्चा विभागाकडून करण्यात आली आहे पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली जाईल. महाराष्ट्राबाहेर असलेल्या सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनाही घरी आणण्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली होती. 

  लॉकडाऊनमुळे राज्यात आणि राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्य पद्धती निश्‍चित केली आहे.सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व , जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत
 
Top