पंढरपूर: “कार्यालयात काम करणाऱ्या सेवकांनी कामाचा अतिरिक्त ताण न घेता, त्या कामात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी केंद्रीत शिक्षण प्रणालीमुळे आपल्या कामाचे स्वरुप बदललेले आहे. कार्यालयातील इतर सेवक आपले सहकारी असतात. काम टाळण्यापेक्षा काम केल्याने आपणास आनंदी राहता येते. कार्यालयातील काम कार्यालयातच करणे व घरी स्वस्थ मनाने राहणे हे तणावमुक्त कामाचे गमक आहे.चांगल्या कामात स्वत:ला गुंतवून घेतल्यास वाईट गोष्टींकडे लक्ष जाणार नाही. सेवकांनी इतरांबद्दलची आसूया टाळली की त्यांना तणाव मुक्त जगता येते.” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी केले.

   येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्रशासकीय व आयक्यूएसी विभाग यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वेबीनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या वेबीनारच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक भोईटे हे होते.

      या सत्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य डॉ.राजेंद्र जाधव यांनीही मार्गदर्शन केले.या वेबीनारचे प्रास्ताविक आयक्यूएसीचे प्रमुख डॉ. अमर कांबळे यांनी केले.

    कोवीड-१९ बाबत घ्यावयाची काळजी या विषयावर बोलताना डॉ. राजेंद्र जाधव म्हणाले की, “मन आजारी पडले की शरीराला आजार होण्यास वेळ लागत नाही. कोवीड-१९ हा सर्वसामान्य आजारासारखाच आजार असून १९६५ मध्ये त्याची ओळख झालेली आहे. इतर साथीच्या आजारांच्या तुलनेत कोव्हीड-१९ मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ २ टक्के इतकेच आहे. परंतु याच्या प्रसाराचा वेग हा अतिशय प्रचंड आहे. त्यामुळे वारंवार साबणाने हात धुणे, गर्दी टाळणे, शिंकताना व खोकताना रुमालाचा वापर करणे, थंड पदार्थांचे सेवन टाळणे,पुरेसी झोप घेणे, मानसिक स्वास्थ राखणे महत्त्वाचे आहे. 

  डॉ.शिवाजी शिंदे ‘कार्यसंस्कृती व कार्यालयीन कामकाज’ या विषयावर मार्गदर्शन करताना , “शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे ही आस्थापने विद्यार्थी केंद्रीत असतात. येथे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून सेवकांनी कामाची शिस्त सांभाळली पाहिजे. 

  या वेबीनारमध्ये महाराष्ट्रातील पाचशेपेक्षा जास्त प्रशासकीय सेवक व महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभाग घेतला. हे वेबीनार यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.समाधान माने, प्रा.राजू मोरे यांनी तांत्रिक सहाय्य केले. उपस्थितांचे आभार कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव यांनी मानले.
 
Top