पंढरपूर,(प्रतिनिधी)- कोरोना लॉकडाऊनमुळे पंढरपूरातील बेघर, भिकारी तसेच अनावधानाने व परिस्थितीने पंढरपूरात अडकले आहेत अशा ३०० गरजूंची उपासमार होऊ लागल्याने, ध्येयवेडे तरुण बेचैन झाले, या सर्वांनी मिळून जे मिळेल ते धान्य शिजवून हवाबंद पाकिटातून गरजूंंना पोहचविण्या साठी व सर्वांना ‘प्रेमाचा घास’ भरविण्याचे कार्य अविरतपणे सुरु झाले. त्यांच्या कार्याची राज्य भरात चर्चा होऊ लागली आहे, प्रशासनाकडूनही त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
       
    पंढरपूरात लॉकडाऊनमुळे भाविक-भक्तांची ये जा बंद आहे, हॉटेल बंद आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून पंढरपूर बंद झाल्याने निराधार,निराश्रीत, बेघर,भिकारी,हॉटेल कामगार यांची उपासमार होऊ लागली. हि उपासमार बघून पंढरपूरातील ध्येयवेड्या तरुणांनी भुकेल्यांना घास भरविण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु आहे.राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या शिकवणीप्रमाणेे भुकेल्याला अन्न देण्यासारखे कोणतेही पुण्यकर्म नाही या वचनानुसार आम्ही पंढरपुरकर फाऊंडेशनच्या कांही तरुणांनी एकत्रीत येवुन पंढरपूरातील एस.टी.स्टॅन्ड,चंद्रभागा नदी वाळवंट परिसर, मठामधे अडकलेली वारकरी मंडळी, विविध रस्त्यावरच्या अंध,अपंग व्यक्तीना जेवण देण्याचे कार्य केले. लॉकडाउन झाल्यापासून आम्ही भुकेलेल्यांना अन्न देत आहोत, पुढेही जो पर्यंत लॉकडाउन राहणार आहे तोपर्यंत पंढरपूर मधे एकही बेघर व्यक्ती उपाशी राहणार नाही या साठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत अशी माहिती आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी दिली.

यासाठी आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे संदिप मांडवे,सतिश माने,हरीभाऊ चव्हाण,गणेश थिटे, शेखर भोसले,ओंकार चव्हाण,गणेश जाधव,विठ्ठल भुमकर,संकेत घोगरदरे,आनंद कथले सर,गणेश शिंदे,गणेश निंबाळकर,आनंद कथले सर यांच्यासह अनेक तरुण परिश्रम घेत आहेत.
 
Top