पंढरपूर,(प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व बँकां तसेच खासगी वित्तीय संस्थांसाठी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही नियमावली जाहीर केली आहे.

यामध्ये सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना आवश्यक काम असेल तरच बँकांच्या शाखेमध्ये येण्याचे आवाहन करावे.बँकेची कामकाजाची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार आहे . त्यावेळी प्रत्येक व्यक्तीमधील सुरक्षित अंतर एक मीटर ठेवावे . ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. बँकांमधील पैशांचे वाटप बँकमित्रांमार्फत जास्तीत जास्त करावे .बँकांनी फक्त रोख भरणा व काढणे ही दोनच कामे प्राधान्याने करावीत. बँकांनी आपले जादा कर्मचारी या कामासाठी नेमावेत जेणेकरून ग्राहकांना शाखेमध्ये कमीत कमी वेळे व्यतीत करावा लागेल. बँकांनी एका वेळेस जास्तीत जास्त तीन ते चार ग्राहकांना शाखेमध्ये येण्यास परवानगी द्यावी व प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्या शिवाय आणि बँक आवाराच्या बाहेर पडल्या शिवाय पुढील ग्राहकांना बँकेमध्ये येण्यास परवानगी देऊ नये. दोन ग्राहकांमधील अंतर तीन फूट असावे .सर्व ग्राहकांनी बँकेच्या इतर वितरण पर्यायांचा म्हणजेच इंटरनेट बँकिंग,मोबाईल बँकिंग यूपीआय, एटीएम,डिपॉझिट मशीन यांचा जास्तीत जास्त वापर करावा. ग्राहकांनी बँकेच्या काउंटर पासून तीन ते पाच फूट अंतर ठेवावे . त्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी .या ग्राहकांची रांग असल्यास त्याचे नियमन करावे व सोशल डिस्टनिंगचे पालन करावे.

सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मास्कचा वापर करावा. यासाठी वापरण्यात येणारे मास्क हे प्रमाणित असलेल्या कोणत्याही औषध दुकानात मिळणारे किंवा घरगुती तयार करण्यात आलेले कापडाचे,रुमालाचे धुन्या योग्य असावे तसेच त्याचा पुर्नवापर करताना स्वच्छ धुऊन निर्जंतुकी करण करून वापरावे ,असे मास्क प्रत्येकाचे स्वतंत्र असावेत व एकमेकांमध्ये हस्तांतरित करू नयेत. वापरलेले मास्क टाकून न देता जाळून टाकावेत. तसेच सर्व एटीएम'मध्ये मुबलक प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध करून द्यावी व तेथे स्वच्छता राखावी यासाठी सर्व बँकांनी तसेच खासगी वित्तीय संस्थांनी योग्य ती कार्यवाही करावी.
 
Top