पंढरपूर - करोना व्हायरस covid-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दिनांक १७ मार्च २०२० ते १४ एप्रिल २०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. तथापि कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य शासनाने दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत राज्यभर लाँकडाऊन जाहीर केला आहे .त्यानुसार मंदिरे समितीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिनांक ३० एप्रिल२०२० पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे श्रींचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे वेळच्यावेळी हजारो वर्षांची प्रथा व परंपरा यांची सांगड घालून करणे आवश्यक आहे. कामातील त्रुटी यामुळे भाविकांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घेणे आवश्यक आहे तसेच वारकरी संप्रदायाचे नित्योपचारा बरोबर अन्य प्रथा परंपरा यावर कटाक्षाने लक्ष असते. ही बाब विचारात घेता पहाटे होणारी श्रींची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंत सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदनउटी पूजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे, त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पद्धतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यतय न आणता मंदिरात नित्य म्हणजे दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत.तसेच इतर सणवार,उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचे पत्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सर्व सदस्य यांच्याशी विचार विनिमय करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीस दिले आहे
 
Top