फलटण - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी साठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या पत्रकारांच्या कल्याणा साठी राज्यपातळीवर कार्यरत दोन्ही संस्थांच्या वतीने प्रत्येकी ११ हजार याप्रमाणे २२ हजार रुपयांचे योगदान मुख्यमंत्री सहायता निधीकडे जमा करण्यात आले.या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी सदर रक्कमेचा धनादेश फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला.

 यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक संघाचे मानद सचिव अमर शेंडे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त गजानन पारखे,भारद्वाज बेडकिहाळ उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की,राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या संपादकांची प्रातिनिधीक संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ राज्यातील वृत्तपत्रांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी गेली ३९ वर्षे कार्यरत आहे. तर महाराष्ट्र पत्रकारकल्याण निधी या संस्थेच्या माध्यमातून मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरण कार्याबरोबरच आपद्ग्रस्त पत्रकारांना आर्थिक सहकार्य करण्याचे काम संस्थेमार्फत गेली ३२ वर्षे सुरु आहे. 
 
Top