अकोला,दि.१८/०४/२०२०,(जिमाका)- जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे. आज प्राप्त ५५ अहवालांनुसार एक रुग्ण पॉझिटीव्ह तर अन्य संशयित रुग्ण निगेटीव्ह असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार,आता जिल्ह्यात कोविडबाधीत १५ रुग्ण असून त्यातील दोघे मयत आहेत. तर अन्य १३ पैकी फेरतपासणीत ११ जण निगेटीव्ह असून फेरतपासणीतील एक तर नव्याने तपासणी झालेला एक असे दोघे रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल आलेली रुग्ण ही एक १७ वर्षीय मुलगी असून दि.१३ रोजी उपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णाचीच ती मुलगी आहे.

ग्रामिण भागात २० हजार जणांची तपासणी

जिल्ह्यातील ग्रामिण भागात आजअखेर २० हजार ७३ जणांची तपासणी करण्यात आली आहे, त्यात आज दिवभरात ८० जणांची तपासणी झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. त्यापैकी २२६ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे संदर्भित करण्यात आले आहेत. तर आज अखेर जिल्ह्यात १९ हजार ३८६ जणांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून अद्याप ६८७ जण हे अलगीकरणात आहेत. त्यांचेवर वैद्यकीय पथके नियमित लक्ष ठेवून आहेत.
 
Top