पुणे, दि.१८/०४/२०२० - पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे दिले.


 पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासना तील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बीष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाही बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी बोलताना ते  पुढे म्हणाले, पुण्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे.त्यासाठी शासना कडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबवावे. त्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्य सेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल, असे स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले,ससून रुग्णालया च्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधून २५ टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार शासनाने यापूर्वीच दिले आहेत.पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालताना काही दिवस दूध व मेडिकल वगळता सर्वच बंद ठेवा केवळ ५ टक्के लोक या नावाखाली फिरतात तर १०० टक्के लोक परिणाम उपभोगत आहेत त्यामुळे सगळं बंद ठेवा असे ते म्हणाले. 
 
Top