खर्डी ,(अमोल कुलकर्णी)- पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक सेवा सुविधा घरपोच देण्यासाठी पुन्हा पारंपरिक बलुतेदार पद्धती सुरू झाली आहे.२२ तारखेपासून सुरू झालेल्या बंद काळामध्ये नाभिक समाजाच्या वतीने घरी जाऊन कटिंग,दाढी सेवा देण्याची पद्धत सुरु केली आहे. त्यामुळे दारात अंगणात पोते टाकून स्टूल ठेवून त्यावर कटिंग करण्याचे हे दिवस आले आहेत. पूर्वीच्या काळी सेवेच्या बदलां मध्ये धान्य फळे-भाजीपाला दिला जायचा. आता देखील काही रोख पैसे किंवा निवडक धान्य, भाजीपाला दिला जात आहे. राज्यातील काही भागांमध्ये घरपोच सेवा देण्याचा सेवेला काही संघटनांचा विरोध दिसून येत आहे पण या सेवा अत्यावश्यक सेवांमध्ये गणल्या जाव्यात व दुकान चालू ठेवून ठेवण्याची परवानगी शासनाकडून मिळावी असे नाभिक समाजाच्यावतीने सांगण्यात आले. उदरनिर्वाहाचे शेती किंवा अन्य साधन नसलेल्या व हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाचे या बंद काळामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. कोणत्याही प्रकारची शासन दरबारी नोंद नसल्याने नुकसानभरपाई वगैरे अन्य लाभांपासून हा समाज नेहमीच वंचित असतो.
दत्तात्रय हिल्लाळ - मी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळांमध्ये वाहकाची नोकरी करतो तरीदेखील आपला पारंपारिक व्यवसाय करताना कोणत्याही स्वरूपाचे संकोच न मानता पिढीजात व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे सुटी व बंद काळामध्ये घरपोच सेवा देण्यामध्ये समाजसेवा आहे . जनसेवा मानून मी ही सेवा देत आहे.
दुकानातून बाहेर न जाता घरी सेवा देण्याच्या जुन्या पद्धतीला विरोध करणारी नाभिक समाजाची तरुण पिढी या काळामध्ये मात्र न लाजता आपल्या व्यवसायामध्ये मुसंडी मारताना दिसून येत आहे.गावापासून दूर वाड्या-वस्त्यांवर घरी जाण्या येण्याचा इंधन खर्च विचारात घेता ना नफा ना तोटा या तत्वावर ही सेवा दिली जात आहे. त्यामुळे गावात सर्वत्र कौतुक होत आहे .
 
Top