कोरोना विषाणूच्या संसर्गमुळे ओढवलेल्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे आणि त्यांचे कार्यालय गरजू नागरिक,सामाजिक संस्था,डॉक्टर यांच्यासाठी सदैव राहणार ऑनलाईन...
मुंबई दि. ०९/०४/२०२० - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामूळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारला दि.२२ मार्च, २०२० रोजी लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला आहे. वेगवेगळ्या राज्यात महाराष्ट्रातून केलेले भाविक, पर्यटक, कामानिमित्ताने गेलेले नागरिक लॉक डाउनमुळे अडकून पडले आहेत. नागरिकांना तसेच लोकांसाठी झगडणाऱ्या सामाजिक संस्थांना कोणाकडे धाव घ्यावी हे कळत नाही. विधानपरिषद उपसभापती पदावर काम करणाऱ्या तसेच महिलांच्या व सर्व सामान्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून अहोरात्र काम करणाऱ्या ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनाची सर्व कार्यालये बंद असली तरीदेखील उपसभापती कार्यालय स्वतःच्या घरातून सुरू ठेवले आहे. कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकांना सेवा देण्याचे आणि त्यांच्या समस्या सोडविण्या साठी अहोरात्र ना.डॉ.गोऱ्हे व त्यांचे कार्यालय काम करत असल्याची प्रचिती महाराष्ट्रातील नागरिकांनाच नव्हे तर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील नागरिकांना येत आहे. या कालावधीत केलेली अत्यंत महत्वाची कामे...

  सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी किरण मोघे, अरुण शिवकर, फरीदा लांबे यांनी सर्व कामगारांना लॉकडाउनमुळे दोन वेळेच्या अन्न बाबत निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत रेशन कार्ड वर मोफत धान्य मिळावे व पुढील 2/3 महिन्याचे धान्य वितरित करण्याबाबत विनंती केली. याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी ना.छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री व मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंना यांच्याशी संवाद साधून धान्य वाटपाबाबत सूचना केल्या. त्याप्रमाणे महाराष्ट्रात तीन महिन्यासाठी धान्य लोकांना मिळण्यास सुरुवात झाली. या कार्यवाहीमुळे महाराष्ट्रातील जवळपास ८०% नागरिकांना योग्य प्रकारे धान्य मिळाले असल्याचे चित्र आहे. 

  देवदर्शनासाठी महाराष्ट्रातील वारकरी ,कामा निमित्ताने आदिवासी नागरिक बाहेरच्या राज्यात अडकल्याबाबत दूरध्वनीवरून डॉ नीलम गोऱ्हे यांना सांगितले. याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी कार्यालयान अधिकारी यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी योग्य पाऊले उचलण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी ना.डॉ.गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी उत्तरप्रदेश सरकारशी बोलणी करून त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले. या अवघड परिस्थितीत वारकरी आपल्या घरी सुखरूप परतल्यामुळे हभप वास्कर महाराजांनी ना.डॉ. गोऱ्हे यांची तुलना ह्दयस्पर्शी शब्दात केली व  आभारही  व्यक्त केले.

  नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील बाराशे ते तेराशेच्या आसपास काम करणारे महाराष्ट्रातील मजूर गुजरातमध्ये ज्याठिकाणी कामासाठी होते त्या मालकांनी त्यांना अन्न व निवारा देण्यासाठी नकार दिला होता. या संदर्भात लोक संघर्ष मोर्चाच्या श्रीमती प्रतिभा शिंदे यांनी उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे या मजुरांची व्यवस्था करावी यासाठी आवश्यक प्रयत्न करणेबाबत विनंती केली होती. यासंदर्भात ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी निवेदन मिळताच  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल आणि गुजरातचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. तसेच स्थानिक पातळीच्या संबंधित अधिकारी यांच्याशी उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांनी फोनद्वारे चर्चा करून त्यांना व्यवस्था करण्याची विनंती केली. उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांनी गुजरात मुख्यमंत्री यांचे सचिव तसेच अहमदाबाद, बारडोली, सुरत, जुनागड येथील जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना या मजुरांना मदत करण्यासाठी विनंती करत होते. या प्रयत्नांना यश आले. आणि मजुरांच्या राहण्याची , अन्नाची व्यवस्था गुजरात प्रशासनाने केली. याबाबत आदिवासी मजुरांनी व लोक संघर्ष मोर्चाच्या सदस्यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले. लॉकडाऊन संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत गुजरात सरकारच्यावतीने त्यांना पोहोचविले जाणार आहे असेही गुजरात स्थानिक प्रशासनाने सांगितले. या प्रयत्नामुळे गुजरातमध्ये मध्यप्रदेश येथीलही काही मजूर होते. त्यांना देखील ना.डॉ.गोऱ्हे मुळे गुजरातमध्ये अन्न व निवारा मिळाला.

 एमपीएससीच्या परीक्षाबाबतच्या अनिश्चितेबाबत उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांनी २४ तासात निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. याबाबत राज्यातील करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केला आहे. याबाबत लवकर निर्णय जाहीर केल्याबाबत विद्यार्थ्यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले आहेत.

   रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे औषधांचा तुटवडा होत असल्याबाबत नागोठणे येथील ग्रामपंचायत सदस्य श्री शैलेंद्र देशपांडे यांनी उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कडे दि.३० मार्च, २०२० रोजी लेखी तक्रार मांडली. याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली व उपसभापती कार्यालय विशेष कार्यकारी अधिकारी यांना पाठपुरावा करण्यासाठी सूचना दिली. याबाबत स्थानिक औषध प्रशासनांशी संपर्क करून औषध तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश ना.डॉ.गोऱ्हे यांनी प्रशासनास दिले. यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवून आज दि.३१ रोजी औषध पुरवठा उपलब्ध करून दिला याबद्दल नागाठणेच्या नागरिकांनी उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांचे आणि त्यांच्या कार्यालयाचे आभार मानले.
 
  इंडियन मेडिकल एसोसिएशनचे डॉ.अविनाश भोंडवे यांनी शासन स्तरावरून लागणाऱ्या मदतीसाठी ना.डॉ.गोऱ्हे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून समस्या सोडवण्यासाठी विनंती केली. त्यांना स्थानिक पातळीवर पीपीई साहित्य आणि मास्क मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती. यासंदर्भात आरोग्य सचिव डॉ प्रदीप व्यास, डॉ.तात्याराव लहाने, डॉ.अर्चना पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांच्या समस्येवर तोडगा काढला.

ना.डॉ.गोऱ्हे ह्या एक नागरिकांसाठी अहोरात्र झगडणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यानी याकाळात आलेल्या प्रत्येक फोनचे निराकरण स्वतः अथवा कार्यालयीन अधिकारी यांच्या मदतीने केल्याचे समाजात प्रकर्षणे जाणवत आहे. याचबरोबर ना.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या स्त्री आधार केंद्र संस्थेच्या अध्यक्षादेखील आहेत.याबाबत देखील ना.डॉ. गोऱ्हे यांनी संस्थेच्यावतीने पीडित महिलांना ऑनलाईन समुदेशन देण्याचे काम सुरू केले आहे. एक संस्थेच्या अहवालानुसार कोरोना महामारीच्या काळात महिलांनावरील अत्याचाराचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचे समुपदेशन आणि त्यांना कायदेशीर मदत करण्याचे काम देखील अहोरात्र ना.डॉ.गोऱ्हे यांची स्त्री आधार केंद्र संस्था ही ऑनलाईन करत आहेत.याचे देखील समाजातून स्वागत होत आहे.  

  नागरिकांना काही समस्या असतील तर त्यांना उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर यांना ७७१९०११३३३, विशेष कार्यकारी अधिकारी अविनाश रणखांब यांना ९९६०३२५१११ या नंबरवर व ई-मेल आयडी neeilamgorhe@gmail.com dychairman.mls@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा असे आवाहन ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.
 
Top