पंढरपूर -  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत पंढरपूर शहरात अनेक खाजगी दवाखाने बंद आहेत.वातावरणातील बदलामुळे  सर्दी,ताप, खोकल्याचा त्रास होत असतो. शहरा तील नागरिकांना या आजारासाठी मोफत  वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ‘कम्युनिटी क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहे

कम्युनिटी क्लिनिक सुलेमान चाळ,नगरपालिका शाळा नं.१२, पंढरपूर येथे सुरु करण्यात आले आहे. या कम्युनिटी क्लिनिकच्या कामकाजास  नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले व प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. 

     यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी , नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

     कम्युनिटी क्लिनिकमध्ये नगपालिकेच्यावतीने औषधांचा पुरवठा करण्यात येणार असून, या ठिकाणी नगरपालिका तसेच खाजगी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. तसेच सर्दी, ताप,खोकल्याचा त्रास असणाऱ्या नागरिकांनी येथे आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर  यांनी केले आहे.
 
Top