* पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना यश *
   अलिबाग, जि. रायगड, दि.२८/०४/२०२०, (जिमाका) - राजस्थान येथील कोटा येथे आय. आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले होते.त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती.
 
     आज त्यांच्या मागणीला यश आले असून राजस्थान सरकारने रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थ्यांना राज्यात आपल्या मूळ गावी रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी दिली आहे. 

     यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनीही कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनी वरून संपर्क साधून या विदयार्थ्यांना कोटा येथून रायगडला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, तहसिलदार विशाल दौंडकर यांनी पुढील समन्वयाची आवश्यक ती तयारी केली.

    दि.२८ रोजी पहाटे कोटा येथून या विद्यार्थ्यांना घेवून बसेस निघाल्या आहेत. प्रवासात त्यांच्या करिता उज्जैन व धुळे येथे फूड पॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.    
 
Top