पंढरपूर,०१/०४/२०२०- कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व  शासकीय व खासगी रुग्णालय नगरपालिके मार्फत निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. रुग्णालयात येणारे काही रुग्ण हे सर्दी ,खोकला व ताप आजाराच्या तपासणीस येत असतात.तसेच त्यात काही रुग्ण संसर्गजन्य आजाराचे असतात. संसर्गजन्य आजाराचा धोका लक्षात घेता नगर पालिकेमार्फत सर्व रुग्णालय निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

    

  शहरामध्ये ॲब्युलन्सनी अत्यावश्यक सेवा सज्ज्‍ ठेवण्यात आली असून,ॲब्युलन्स चालकाला संसर्गजन्य आजाराचा धोका लक्षात घेवून वैद्यकीय सुरक्षा किट देण्याचे निर्देश यावेळी प्रांतधिकारी ढोले यांनी दिले.अत्यावश्यक सेवेसाठी मंदीर समितीची ॲब्युलन्स उपजिल्हा रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. 

     तालुक्यातील शेतीमाल प्रक्रीया उद्योगाची दुकानातील बी-बियाणे, औषधे आदी मालांची जादा दराने विक्री होऊ नये यासाठी कृषि विभागाच्या वतीने पथक तयार करुन वेळोवेळी कृषि मालाच्या दुकानाची तपासणी करावी अशा सुचनाही प्रांतधिकारी ढोले यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप केचे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, बीव्हीजी चे डॉ.अनिल काळे उपस्थित होते.

 नगरपालिकेमार्फत १०२ खासगी व उपजिल्हा रुग्णालयात सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी : मुख्याधिकारी मानोरकर

 

कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्या साठी नगरपालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच नगरपालिका हद्दीतील १०२ खासगी व उपजिल्हा रुग्णालय येथील सर्व बाह्य रुग्ण विभागासह संपूर्ण रुग्णालयामध्ये सोडियम हायपोक्लोराइड ची फवारणी व परिसरात ब्लीचिंग पावडर टाकून निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

तसेच शहरातील बँका व ए.टी.एम. सेंटरचेही  निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहेत. याबाबत बँकांनीदेखील आपल्या स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात अशा सुचनाही मुख्याधिकारी मानोरकर यांनी संबधित बॅंक अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
 
Top