पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोना विषाणुमुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे हातावरचं पोट असलेल्या सर्वसामान्यांना शासनाची मदत मिळेपर्यंत रोजच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.अशा गरजूंना अत्यावश्यक रेशनमाल आणि जीवनावश्यक वस्तुंचे वाटप प्रभाग क्रमांक १४ मधील दानशूर नागरिकांच्यावतीने आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेविका सौ. अर्चना नवनाथ रानगट यांनी नुकतेच स्वखर्चातुन प्रभागातील मजुर कुटुंबियांना स्वखर्चातुन रेशन व अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा घरपोहोच केला होता.


आज रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला, मंगळवेढेकर नगर पंढरपूर येथे नगरसेविका सौ. अर्चना नवनाथ रानगट यांचे संकल्पनेतुन दुसर्‍या फेरीमध्ये आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते प्रत्येक कुटुंबाला दहा दिवस पुरेल एवढे अत्यावश्यक साहित्याचे व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव सर, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,माजी नगरसेवक तुकाराम राऊत, नागेश सिंघण सर, आण्णा ऐतवाडकर, माजी नगरसेवक नारायण सिंघण, शहाजी रानगट, सावंत सर, ज्योतीराम गोडसे, संतोष डोंगरे, गणेश सिंघन आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी नवनाथ रानगट मित्र मंडळ, उन्नती परिवार यांनी मोलाचे सहकार्य केले.

  प्रभागामध्ये सर्वत्र जंतुनाशकाची फवारणी केली आहे. याचबरोबर नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा,अशी विनंती केली आहे. लॉक डाऊनच्या काळात प्रभागातील कोणत्याही नागरिकास आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्‍वासन देण्यात आले. पांडुरंग कृपेने लवकरच कोरोनाचे संकट दुर होईल व लॉकडाऊन थांबेल. तरीसुध्दा या काळात नागरिकांनी कोणतीही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगरसेविका सौ.अर्चना नवनाथ रानगट यांनी केले आहे.
 
Top