पंढरपूर ,२७/०४/२०२०- पंढरपूर शहरातील ,एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णाला कोरोनोचा संसर्ग झाल्याने त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचे अतिदक्षता म्हणून संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असून इतरांचे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यावर विशेष पथकाचे लक्ष राहणार असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.


    कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजने बाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले आदी उपस्थित होते.

      यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले बोलताना म्हणाले, कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांची यादी तयार करण्यात आली आहे. संपर्कात आलेल्या शहरातील व ग्रामीण भागातील  प्रत्येक नागरीकांचे  होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच संबधित रुग्णालयात दिनांक २१ ते २६ एप्रिल कालावधीत दाखल झालेल्या व  डिसचार्ज करण्यात आलेल्या रुग्णाची देखील माहिती घेण्यात आली आहे. संबधित रुग्णालयात नव्याने कोणताही रुग्ण दाखल होणार नाही यांची दक्षता घ्यावी तसेच डिसचार्ज दिलेल्या रुग्णांना क्वारंटाईनचे शिक्के मारावेत अशा सूचना प्रांतधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

    शहरातील व ग्रामीण भागातील डॉक्टरांनी रुग्णांची शस्त्रक्रिया करताना सर्व प्राथमिक तपासण्या करुन घ्याव्यात. खाजगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याबाबत कार्यवाही करावी.नगरपालिकेने शहरातील मठ, मंगल कार्यालयाची यादी तयार करावी, होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरीक बाहेर फिरत असल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशा सूचनाही प्रांतधिकारी ढोले यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरु नये,पण काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले.
 
Top