नाशिक - वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.माईनकर, इंदिरानगर पोलिस स्टेशन, नाशिकला तीन महिन्या पूर्वी आले आणि ही कोरोनाची धावपळ चालू झाली.

कडक शिस्तीचा माणूस, कायद्याच्या जरा विरूध्द गेलं की यांच्या मस्तकावरची शीर थड थड उडायला लागते. आज सर स्वत: रोजच्या प्रमाणे राऊंडला निघाले होते.कोणी ना कोणी तरी दुकान उघडं ठेवायचा किंवा उगाच जमावबंदी कशी असते ते बघायला बाहेर पडायचा. असं कोणी सरांच्या तावडीत सापडलं की त्याची खैर नाही. तो नागरिक बेजबाबदार असल्याचा सेल्फी काढून त्याला जबाबदारीची जाणीव करून देणे हि माईनकर साहेबांची नागरिकांना शिस्त लावण्या साठी युक्ती सर्वत्र चर्चेत आहे.

आजही तसंच झालं, वडाळा गावाला रस्त्यावर एका टपरीवजा घराचं शटर अर्धं वर ठेवलेले दिसले. सरांनी जीप साईडला घ्यायला सांगितली आणि जीप थांबायच्या आतच चालत्या जीपमधून उतरून लांब पाऊले टाकत सर त्या शटरपर्यंत पोचले देखील.आत बांगड्यांच छोटंसं दुकान होतं.

हातातील स्टीकने शटरवर खट खट करत सरांनी रागातच विचारलं - कोण आहे रे इकडे आणि हे शटर का उघडं ठेवलंय ? दुकानं बंद ठेवायची आहेत माहित नाही का ?

एक सत्तर - पंच्याहत्तर वर्षाची आजी भिंतीचा आधार घेत घेत बाहेर आली.

लेकरा,दुकान नाही उघडं ठेवलेलं. म्हाताऱ्याची उन्हानं काहिली होत होती, मधुनच झुळूक आली की जीवाला थंड वाटायचं म्हणून ठेवलं शटर उघडं थोडा वेळ. तू म्हणतोस तर बाबा करते बंद.
म्हातारीला बघून सरांचा राग निवळला होता.

बरं, बरं. बाकी घरात कोण असतं ? बोलता बोलता सरांनी घराबाहेरच बुट काढले व देवाला नमस्कार करण्याच्या बहाण्याने घरात एक चक्कर मारून आले.

परिस्थिती बेताचीच होती. जेमतेम एक वेळचं जेवण होईल इतपतच शिधा होता.लेक मालेगावच्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. सुट्टीला घरी यायची,तेव्हा थोडे पैसे घेऊन यायची पण आता या साथीच्या रोगाने तिला रजा मिळत नाही. एरवी या बांगड्या विकून दोन पैसे सुटायचे, पण आता तर दुकानही बंदच आहेआणि कोणी गिऱ्हाईक येतही नाही.

पण मग पैश्या पाण्याचं, डाळ तांदूळाचं काय ?"

लेकरा, सगळं बेस आहे बघं आणि आम्ही आहोत वारकरी, माऊली या ना त्या रुपाने पाठीशी उभी रहातेच."

काही न बोलता सर बाहेर आले, हवालदाराला त्या आजींचा पत्ता टिपून घ्यायला सांगितला आणि आजीकडे पोचवायला सांगितले.

"आणि हो," स्वतःच्या पाकिटातून २००० ची नोट काढून हवालदाराच्या हातावर ठेवत सर पुढे म्हणाले,.

"हेही त्या आजीला दे.मी दिलेत म्हणून सांगू नकोस."

दुसऱ्या दिवशी मुद्दाम सर त्या आजीकडे गेले.
आजी जणू सरांची वाटच बघत होती.आलास लेकरा, ये ये.समोर मोठा साहेब उभा आहे याची जराही भीती न वाटता आपल्या सहज सुलभ साधेपणाने बोलत होती.

"काल तू विचारलंस ना जेवणाखाण्याची सोय काय म्हणून ? काल जेमतेमच शिधा उरला होता.
मी विठू माऊलीला साकडं घातलं होतं.माझ्या म्हाताऱ्याला उपाशी ठेवू नकोस म्हणून. आणि देव हाकेला धावला बघ! कुठल्याशा सरकारी ऑफिसातून एक माणूस आला आणि महिन्याचं राशन घरात भरून गेला.त्याच्या रुपानं काल प्रत्यक्ष विठू माऊलीच घरी येऊन गेली बघ."
आजी बोलत होत्या.

तिला थांबवून आजोबा बोलू लागले, "पोरा, त्या बाबाने हे दोन हजार रुपयेही दिलेत खर्चा पाण्याला. पण आम्हाला आता कशाला लागतात हे पैसे ? राशन भरलंय,बाकीचा तर खर्च काही नाही.तू हे पैसे घे आणि कोणा गरजू गरीब माणसाला देऊन टाक!त्याला अडीअडचणीला उपयोगी पडतील. आणि लागली आम्हाला गरज, तर तो विठूराया आहेच की मदत करायला."

त्या आजी आजोबांच्या जगण्याच्या साध्या सोप्या तत्वज्ञानाला सरांकडे उत्तर नव्हतं.

त्यांनी निमुटपणे दोन हात जोडून नमस्कार केला आणि गाडीत बसता बसता हवालदाराला म्हणाले - "इतकी निर्मळ श्रद्धाळू माणसं !
खरंच, यांच्या रुपाने, आज देव पाहिला."
 संतोष कमोद - नाशिक 
 
Top