दिवसभरात १०४ गुन्ह्यांची नोंद तर ५० लाख ८६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त
     मुंबई दि.१५ /०४/२०२०- कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे  देशात व राज्यात ०३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.यामुळे राज्यातील ‌सर्व मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरू आहे. काल म्हणजेच १४ एप्रिल २०२० रोजी राज्यात १०४ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर १४ वाहने जप्त करण्याबरोबरच ५० लाख ८६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

     १४ तारखेच्या अवैध मद्य विरुद्ध कारवाईमध्ये सर्वात मोठी कारवाई अहमदनगर जिल्ह्याची असून तेथे निमगाव कोर्‍हाळे तालुका राहता येथे बियर चे ८४४ बॉक्स व वाईनचे १२० बॉक्स असे एकूण २४.३९ लाख किमतीचे ९६४ बॉक्स जप्त करण्यात आले आहे.

     २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत राज्यात २६९७ गुन्हे नोंदविण्यात आले असून ११०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आतापर्यंत १५७ वाहने जप्त करण्यात आली असून ६ कोटी ८९४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

     अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे. सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक ८४२२००११३३ आहे.या क्रमांकावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात.
 
Top