वाखरी- वाखरी,ता.पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरूकुल निवासी शाळेमध्ये ऑनलाइन अध्यापन सुुुरु केले आहे.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. या आकस्मिक संकटाचा अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे आणि शिक्षण क्षेत्र त्यास अपवाद नाही. साधारणत: एप्रिल महिण्यापासून सर्वत्र नव्या शैक्षणिक सत्राला सुरूवात होत असते. परंतु लॉकडाउनमुळे देशातील सर्व शाळा बंद आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय मुलांच्या हातांना आणि डोक्याला जर रचनात्मक काम दिले पाहिजे.

त्यामुळे एमआयटी विश्वशांती गुरूकूल निवासी शाळेने शाळाच विद्यार्थ्यांच्या घरी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोहचवली आहे. झूम ऍपच्या मदतीने ऑनलाईन लर्निंग पद्धतीचा अवलंब करून एमआयटी शाळेने १ एप्रिल पासून पुढील वर्षीच्या नियमित अभ्याक्रमाला सुरूवात केली आहे.

या उपक्रमाविषयी माहिती देताना शाळेचे प्राचार्य शिवाजी गवळी यांनी सांगितले शाळेने सर्व पालकांशी संपर्क करून त्यांना ऑनलाईन क्लासेसबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच टाटा क्लास एज या शैक्षणिक उपक्रमासोबत भागीदारी करून शाळेच्या सर्व शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनाचे प्रशिक्षण दिले. आता शाळेचे सर्व शिक्षक १०:०० ते १:०० या वेळेमध्ये त्यांच्या घरी बसून मोबाईल, लॅपटॉप यांच्या मदतीने व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे अध्यापन करतात आणि विद्यार्थी त्यांच्या घरी बसून मोबाईल, लॅपटॉपवर शिक्षकांशी संवाद करतात.

 एमआयटी शाळेने सुरू केलेल्या या उपक्रमाला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाळा बंद असतानादेखील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळेकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top