पंढरपूर ,२०/०४/२०२०- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी आणि पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरातील मेडिकल दुकाने व दवाखान्यांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या उपक्रमाचे आज सकाळी भक्ती मार्गावरील केमिस्ट भवन येथे उदघाटन करण्यात आले.


यावेळी उदघाटक म्हणून पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले आणि स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे उपस्थित होते. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत मानोरकर, पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, असोसिएशनचे पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रशांत खलीपे, सतीश सादिगले, गोवर्धन भट्टड यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते.


यावेळी स्वेरीतील शिक्षकेतर कर्मचारी प्रतीक रोंगे, अजित रोकडे, बापू माने व उत्तम पवार यांनीही उत्स्फुर्तपणे फवारणी करण्याचे काम केले. कांही दिवसापूर्वी स्वेरीच्यावतीने गोपाळपूरमध्ये फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आलेले होते तसेच कोरोना विषाणूचा संभाव्य संसर्ग रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनास स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व फार्मसी कॉलेज, गोपाळपूरच्या इमारती कोविड केअर सेंटर्स म्हणून वापरण्यासाठी देण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली. स्वेरीमध्ये या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्यदायी वातावरण, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, वाय-फाय आदी सुविधा स्वेरीकडून दिल्या जाणार आहेत. संभाव्य कोरोना बाधित रुग्णांना स्वेरीत प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार केल्यामुळे या इमारतींचे इतर इमारतीं पासून विलगीकरण साधणे सहज शक्य होणार आहे. ‘या संकटाचा धडाडीने सामना करण्यासाठी फक्त शासन, प्रशासनच नव्हे तर प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत पुढे येवून या लढ्यात सहभागी होणे गरजेचे आहे’असे डॉ.बी. पी.रोंगे यांनी सांगितले.
 
Top