नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर) - मागील १०० वर्षातील बहुधा सर्वात मोठा जागतिक स्तरावर पसरलेला संसर्गजन्य रोग म्हणजेच Covid- 19 अर्थात कोरोना वायरस. 

या संसर्गजन्य रोगाची भयानकता याच गोष्टीवरून लक्षात येऊ शकते की, आजपर्यंत जगभरातील ३ लाखापेक्षा अधिक लोकांना याची लागण झालेली आहे व हजारो नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत.
 इटली,इराण, फ्रान्स,अमेरिका यासारख्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या आणि जागतिक दर्जाची वैद्यकीय व्यवस्था आणि सुसज्जता  यासाठी प्रसिद्ध असणारे हे देश आज अक्षरश: या अदृश्य व्हायरस समोर हतबल झालेले आहेत. 

 पृथ्वीतलावरील सर्वात अनमोल समजला जाणारा सजीव म्हणजे मनुष्य प्राणी हा मनुष्यप्राणी आज श्वास घेण्याच्या अडचणीने, खोकलत असताना शेकडोंच्या संख्येने उपचाराअभावी तडफडत मरत असल्याचे चित्र आपण पाहत आहोत.

 कोरोना या विषाणूमुळे गावागावात बाहेरून येणाऱ्या आपल्याच गावकर्‍याकडे, नातेवाईकां कडे संशयाने पाहिलं जाऊ लागलं आहे. 

 आपल्या रक्तातील नातलग उपचार घेत असताना कोणालाही त्यांना भेटायला जाता येत नाही.
आई-वडील- भाऊ- मुलगा पती-पत्नी यांच्यापैकी कोणाला घरी कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्यास खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना Quarantine मध्ये आपल्याच घरी वेगळं ठेवलं जाऊ लागलं आहे. सर्व शासकीय कार्यालये एक तर बँद आहेत किंवा ५ % कर्मचारी हजर आहेत. 

अशावेळी आपले पती/पत्नी,मुलबाळ यांच्या पासून दूर राहून जनतेच्या हितासाठी आपलं कर्तव्य बजावणारी यंत्रणा म्हणजेच महाराष्ट्र पोलीस.
 कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरामध्ये पसरला असतानासुद्धा कुठलाही पोलीस वैद्यकीय रजेवर गेला, दीर्घ रजेवर गेला किंवा बाहेर पडण्यास घाबरून नोकरीला नकार दिला असं अजून तरी कोणी ऐकलेलं नाही यावरून मित्रांनो पोलिसांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा जनतेमध्ये या रोगाचा संसर्ग होऊ नये, समाजामध्ये याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोना या रोगाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर, बाजारांमध्ये बंदोबस्त ड्यूटी करीत आहेत. 

 आपल्या समाजामध्ये नेहमीच पोलिसांना दोष देण्याची किंवा बरे वाईट म्हणण्याची मानसिकता रुजलेली आहे; परंतु आज जेव्हा प्रत्येक जण मी स्वतः, माझे कुटुंब या विषाणूपासून कसे सुरक्षित राहू या गोष्टीमध्ये असताना तुम्हा सर्वांच्या सुरक्षित आरोग्यमय जीवनासाठी आम्ही रस्त्यावर उतरून बंदोबस्त करीत आहोत,ते फक्त कोणी अनावश्यक रित्या बाहेर पडू नये, या विषाणूचा संसर्ग वाढू नये; आपलं गाव, तालुका, राज्य आणि देश सुरक्षित राहावं यासाठीच. 

माझे शिक्षक वडील, पोस्टल असिस्टंट भाऊ, MPSC राज्य सेवा इंटरव्ह्यू देऊन आलेला भाऊ घरीच असताना मी PSI म्हणून बाहेर कर्तव्य बजावीत आहे, हे पाहून काळजी करणारे आई - वडील आहेत. त्यांना नेहमी सांगावं लागतंय की, मी खुप काळजी घेऊन ड्युटी करतोय तेंव्हा कुठे त्यांना धीर येतोय,त्यामूळे अशा परिस्थितीत आपल्यासाठी कर्तव्य करीत असलेल्या पोलीस यंत्रणेचे सूचनांचे पालन करा.
   
मित्रांनो, इतर देशांमध्ये काय घडत आहे हे लक्षात घ्या; या Covid-19  विषाणू बाबत गांभीर्य बाळगा आणि आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन हे देत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. येणारे २१ दिवस हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 

 आपल्या घरी राहा, कोणीही अनावश्यक रित्या बाहेर पडू नका. अगदीच अत्यंत निकडीची गोष्ट असेल तरच घरातील एक सदस्य बाहेर जाऊन ती वस्तू घेऊन येईल आणि तो सुद्धा आत जाताना sanitizer,  साबणाने हात पाय धूऊन आपले कपडे बाहेरील बाजूस ठेवूनच तो घरात प्रवेश करेल याची दक्षता घ्या. 

         काळजी घ्या, घाबरू नका


 या सर्व गोष्टी घडत असताना चांगली गोष्ट ही आहे की ज्यांच्या टेस्ट पॉझिटिव आल्या होत्या असे बरेच जण सुद्धा या रोगातून पूर्णपणे बरे होऊन दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन आपापल्या घरी गेलेले आहेत.त्यामुळे घाबरण्याचं मुळीच कारण नाही.

  आपल्याला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे Social Distancing  ठेवणे, काळजी घेणे आणि घराबाहेर न पडणे.

 केंद्र शासन,राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. 
कृपया येणारे २१ दिवस आपल्या घरातून अत्यंत निकडीच्या कारणाशिवाय बाहेर पडू नका.

   हे लिहिण्याचं कारण म्हणजे एक पोलिस अधिकारी म्हणून मी गेले काही दिवस कर्तव्य बजावत असताना आपल्या लोकांमध्ये आढळून आलेली गोष्ट म्हणजे निष्काळजीपणा, सदर गोष्टीचं गांभीर्य नसणे आणि विनाकारण आवश्यकता नसताना बाहेर पडणे, आपल्या घरासमोर किंवा कट्ट्यावर गप्पा मारत बसणे, आम्हाला काही होत नाही,असे करताना बरेच नागरिक दिसून येत आहेत. कृपा, करून ह्या गोष्टी टाळा.

  एक सजग नागरिक म्हणून मनाशी निर्धार करा की, मी या विषाणूची वाढणारी साखळी तोडणार आहे, नव्हे ती १०० % तोडेन, मीच माझा रक्षक आहे. 

  मित्रांनो,येणारे २१ दिवस आपल्या घरात राहून कुठल्याही प्रकारे बाहेर न येता Social Distancing  मेंटेन ठेवून, Personal Habits मध्ये बदल करून या विषाणूला हद्दपार करू या. 

जय हिंद- जय महाराष्ट्र

PSI रियाज मुनीर शेख , भिगवण पोलिस ठाणे 
पुणे ग्रामीण
 
Top