पंढरपूर ,३०/०३/२०२०- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरीकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रशासन प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये,असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी केले आहे.
संचारबंदी लागू असतानादेखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.  पंढरपूरातील  ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत विविध भागात नागरीक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता  २९ नागरिकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी दिली आहे.
कोरोना रोगाच्या आपत्तीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लॉक डाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.करोना हा संसर्गजन्य रोग असून सामाजिक संपर्क टाळणे हे संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करुन, संचार बंदीच्या काळात घरातच थांबून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी केले आहे.
 
Top