नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)- पाटबंधारे विभागाच्या निरा उजवा कालव्याचे चौकी नंबर आठ जवळील मौजे कण्हेर,तालुका माळशिरस हद्दीत निरिक्षण तटाकडील बाजूस कालवा हद्दीतील कँनाल बंधाऱ्याचा मुरूम चोरून नेणाऱ्यास चक्क पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
   सदर मुरुम चोरी प्रकरणी अँड प्रशांत रुपनवर यांनी दिनांक २४/१२/२०१९ रोजी तक्रार दिली तरीही त्यावर अद्याप ठोस कारवाई झाली नाही कालवा निरीक्षक यांनी दिनांक २६/१२/२०१९ रोजी स्पोट ची पाहणी करुन वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे. मुरूम चोरल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. मुरूम चोरांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असा अनुपालन अहवाल ही खात्यास प्राप्त आहे तरीसुद्धा फौजदारी गुन्हा का नोंदवला जात नाही. चोरी सापडत नाही असे पाटबंधारे खात्यातील वरिष्ठांचे म्हणणे आहे हा प्रकार चोरट्यांच्या कृत्यांवर पांघरूण घालणार आहे.

   सदर प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केल्यास चोरांचे नाव पोलीस शोधून काढतील ना डिपार्टमेंट ने त्यास सहानभूती दाखवण्याचे कारण काय मुरूम माती उपसल्यामुळे बंधाऱ्याची कडी कमकुवत बनली आहे तर अनेक झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्याने वृक्ष जळून जाण्याच्या मार्गावर आहेत .सदरचा प्रकार गेल्या दोन-तीन वर्षापासून घडत असताना पाटबंधारे विभागाचे तिथल्या इन्चार्ज वाल्याने काय झोपा काढल्या का? अँड प्रशांत रुपनवर यांनी तक्रार देऊनही गुन्हा दाखल करण्यास उशीर होत असल्याने त्या मुरूम चोरांचा पोशिंदा पाटबंधारे खात्यातच असल्याचा परिसरातील शेतकऱ्यांचा संशय आहे .भविष्यात तो कडा कमकुवत होऊन पाजर लागल्यास किंवा फुटल्यास अनेक शेतकऱ्यांना पाण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. झाडाच्या मुळ्या मोकळा झाल्याने अनेक झाडे मरू शकतात. त्यामुळे सदर चोरांचा तात्काळ बंदोबस्त करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवून पोलिसांमार्फत त्याचा शोध होऊन कारवाई करणे निकडीचे असताना पाटबंधारे विभागाचा हा झोपलेपणा काय कामाचा ?

  अँड रुपनवर यांनी दिलेली तक्रार रास्त असताना ती दडपण्याचा प्रकार पाटबंधारे विभागाचे अधिकारी कुणाच्या दडपणाखाली करतात काय?  हा गंभीर प्रकार आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आंदोलन उभे राहू शकते. किरकोळ चोऱ्या करणाऱ्याला पोलीस पकडू शकतात तर दिवसा ढवळ्या पोकलेन, टिपर यांनी मुरूम  उपसलेला माणूस पोलिसांना सापडणार नाही हा पाटबंधारे विभागाचा कयास किती फसवा आहे.
     
        याप्रकरणी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून खराब झालेला काढ दुरुस्त करावा व मोकळ्या झालेल्या झाडांच्या मुळ्या मातीने बुजवून घेऊन त्यात पाणी द्यावे व त्या वृक्षांना जीवन द्यावे व मुरूम चोरांचा बंदोबस्त करावा ही मागणी जोर धरत आहे.     

    कर्तव्यदक्षपणा दाखवून ॲड रुपनवर यांनी तक्रार देऊन पाटबंधारे विभागाला जाग आणली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
 
Top