पंढरपूर - कोरोना व्हायरस (covid-19) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र स्वरूपाचा संसर्गजन्य असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती १७/०३/२०२० ते ३१/०३/२०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. दिनांक ०४/०४/२०२० रोजी चैत्र यात्रा भरत असून या यात्रेला अंदाजे तीन ते चार लाख भाविक महाराष्ट्र इतर राज्यातून येत असतात.


केंद्र शासनाने दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण देशभरात लाँकडाऊन केला आहे .तसेच आंतरजिल्हा प्रवास करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. अशा पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात भाविक आले तर कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठा होऊ शकतो ही बाब विचारात घेऊन मंदिरे समितीने दिनांक ०४ एप्रिल २०२० रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र या कालावधीत श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील, त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे परंपरेनुसार येणाऱ्या सर्व दिंड्या व सर्व पायी येणाऱ्या वारकरी भाविकांनी यात्रा रद्द झाले असल्याने व दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने कृपया कोणीही क्षेत्र पंढरपूरला येऊ नये असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनाव्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्य शासनाकडून नागरिकांना विविध उपाय योजना व सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीने प्रशासनास मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. पंढरपूर शहर व परिसर घरातील बेघर व निराधार नागरिकांसाठी अन्न पाकिट उपलब्ध करून देण्यात येत आहेत तसेच राज्य शासनाला आर्थिक मदत करणे ही काळाची गरज आहे ही बाब विचारात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर च्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे . सदरचे पत्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य सर्वश्री आमदार सुजितसिंह ठाकूर ,आमदार रामचंद्र कदम, संभाजी शिंदे, श्रीमती शकुंतला नंडगिरे ,डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा ,ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, एँड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, भागवत भूषण अतुल शास्त्री भगरे गुरुजी,ह भ प शिवाजी महाराज मोरे, सौ. साधनाताई नागेश भोसले, यांच्याशी विचार विनिमय करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे  कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
 
Top