पंढरपूर - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्या साठी संचारबंदी लागू करण्यात आली असताना नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील, यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे .


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन करत असताना अनेक नागरिक अद्यापही घराबाहेर येत आहेत. अशा नागरिकांना पंढरपूर शहर पोलिसांकडून संत तुकाराम महाराजांचे अभंग गाऊन प्रबोधन करण्यात आले. तसेच कपाळी बुक्का देखील लावण्यात आला. पंढरपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना अडवून वारकरी वेशातील पो.ना. प्रसाद औटी यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि हरिपाठातील काही ओव्यादेखील म्हणून दाखवल्या. तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजीत पाटील, पो.ना.अभिजीत कांबळे यांनी वारकरी वेशभूषा परिधान करत अभंग गायन सुरू केले असताना वारकरी वेशातील पोलिसांनी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या कपाळी विठूरायाचा बुक्का लावला तर नागरिकांना सुगंधी दूध वाटप करण्यात आले.

सध्या किराणा,औषधे, भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे .
 
Top