मुंबई दि. १२ - पुणे विभागातील सोलापूर,पंढरपूर तसेच पुणे जिल्हयातील लेण्याद्री, एकविरा देवस्थानाच्या ठिकाणी पर्यटक तसेच सर्व भक्तांना स्वच्छतागृहे, स्नानगृह उपलब्ध करुन द्यावेत जेणे करुन भक्त पर्यटक यांना सुखसुविधा उपलब्ध होऊन पर्यावरणालाही धोका निर्माण होणार नाही. यासाठी आवश्यकता सुखसुविधा उपलब्ध होण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी. अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आयोजीत बैठकीत दिल्या.

विधान भवन येथील दालनात पुणे विभागातंर्गत सोलापूर, पंढरपूर व पुणे जिल्हयातील लेण्याद्री, एकविरा देवस्थानाचे पुरातत्व विभागाकडे प्रलंबित प्रश्नाबाबत आज बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सांस्कृतिक कार्य उपसचिव विलास थोरात,पुरातत्व विभागाचे संचालक,डॉ.तेजस गर्गे, संजीव जाधव अतिरिक्त जिल्हाधिकारी,सोलापूर, विठ्ठल जोशी, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे, पंढरपूर, तहसिलदार मधुसूदन बर्वे, पर्यटन सहसंचालक धनजंय सावळकर, तसेच देवस्थान समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पंढरपूर येथील देवस्थानाच्या विकास कामासाठी आर्किटेक मार्फत तयार करण्यात आलेल्या सविस्तर विकास अहवालानुसार येथील देवस्थानाना सुशोभीत करावेत. याबाबत आर्किटेक यांना देय असणारी फी देण्यासंदर्भात देवस्थान समितीने कार्यवाही करावी.येथील भक्तांना स्काय वॉक, दर्शन मंडप यासारख्या सुविधा देण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पर्यटन विभागाला पाठवावा. पर्यटन व यात्रेसाठी येणाऱ्या पर्यटकांना/भक्तांना उंचावरुन यात्रा पाहण्यासाठी उंचे मनोरे उभे करणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव मंदिर समितीने शासनास पाठवावा.

एकविरा देवस्थान आणि आजूबाजूला असलेले अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच येथील देवस्थानाच्या पायऱ्यांची व आवश्यक ठिकाणची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पक्की गटारे बांधावित. महिला व पुरुंषासाठी स्वतंत्र शौचालये,भक्तांना बसण्यासाठी लोखंडी बाके,चप्पल स्टँड यांचीही व्यवस्था करण्यात यावी.

लेण्याद्री देवस्थाना संदर्भात सविस्तर बैठक पुढील आठवडयात घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

तसेच सर्व देवस्थांनाना भेटी देणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर सौर उर्जा,सीसीटीव्ही, लाईट यांचेही नियोजन करण्यात यावे. सर्व भक्तांना संकेतस्थळावर प्रसाद उपलब्ध करुन द्यावा. त्या-त्या भागातील प्रसिध्द असलेल्या वस्तू संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्याव्यात.
 
Top