महिला शक्तीची समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका – अँड. मनाली कुलकर्णी
महिला सन्मानाची भूमिका समाजात रुजली पाहिजे – अँड.विनया गिराम

पंढरपूर – “महिला ह्या अबला नसून सबला आहेत.त्यांच्यात खूप शक्ती असते. या शक्तीचा त्यांनी योग्य उपयोग केल्यास समाजाच्या विकासात त्यांची महत्वाची भूमिका ठरू शकते. वडील, भावंडे व पती ही नाती महिलांच्या आयुष्यात महत्त्वाची असतात. त्या नात्यांतील पुरुषांचे ऐकण्याची सवय महिलांना लागते. ‘हे ऐकणे’ एका मर्यादीत कक्षेत ठेवले तर महिलांच्या आत्मविकासाला आकार प्राप्त होईल.शिक्षक हे सर्वांपेक्षा मोठे असतात.शिक्षण व संस्कारातून समाजातील विविध स्तरातील लोक घडविण्याचे काम शिक्षक करतात ”असे प्रतिपादन अँड. मनाली कुलकर्णी यांनी केले. 

  रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात महिला दिना निमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक भोईटे, अँड. विनया गिराम, उपप्राचार्य बी.डी.रोंगे, उपप्राचार्य अशोक चंदनशिवे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे, प्रोफेसर डॉ. सुजाता भोईटे आदी उपस्थित होते.

   या कार्यक्रमात न्यायाधिश परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल अँड. मनाली कुलकर्णी व अँड. विनया गिराम यांचा प्राचार्य डॉ.अशोक भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
यावेळी अँड.विनया गिराम म्हणाल्या की, “देशात महिलांना सुरक्षा देणारे खूप कायदे आहेत. मात्र समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी जोपर्यंत सुधारत नाही. तोपर्यंत महिलांना सुरक्षा मिळू शकत नाही. प्रत्येक आई-वडिलांनी मुलां मुलींवर समान दर्जा व समान संधीचे संस्कार केले तर समाज अधिक सक्षम होईल. यशाच्या उंच शिखरावर पोहचलेल्या महिलांचा सत्कार करताना आपण याचेही भान ठेवले पाहिजे की ज्या महिलांना रोजच शेताशिवारात खूप काबाडकष्ट करावे लागते. श्रम करावे लागतात. अशा महिलांचाही सत्कार व सन्मान करता आला पाहिजे.” 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रियांना विषमतेची वागणूक दिली जात होती. स्त्रियांना माणूस म्हणून वागणूक मिळविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष केला. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे. हा खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचा विजय आहे. स्त्रियां शिवाय पुरुषांच्या जीवनाला पूर्णत्त्व प्राप्त होत नाही. याची जाणीव ठेवून पुरुषांनी महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. महिलांचा नेहमी सन्मान ठेवला तर समाजाचे स्वास्थ आबाधित राहण्यास मदत होते.” 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास समितीच्या प्रमुख प्रोफेसर डॉ.फैमिदा विजापुरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सुनिता मगर यांनी करुन दिला.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षिका आणि शिक्षिकेतर सेविका यांचा स्नेहवस्त्र व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सिनिअर, ज्युनिअर व व्यवसाय अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सारिका भांगे यांनी केले. उपस्थितांचे आभार पदार्थविज्ञान विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ.लतिका बागल यांनी मानले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
 
Top