क.भा.पा.महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय विक्रमास गवसणी 

जगातील सगळ्यात मोठे  डेस्क कॅलेंडर पंढरपूरात ” 

पंढरपूर (प्रतिनिधी) :- येथील श्री. व सौ. सविता रवि सोनार या दाम्पत्यांची सुवर्णकन्या व क. भा. पा. महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असणाऱ्या  कु. रेवती रवि सोनार हिला तिच्या अठराव्या वाढदिवसाच्या औचित्याने तिचा भाऊ चि. ओंकार रवि सोनार याच्याकडून भेट म्हणून देण्यात आलेले डेस्क कॅलेंडर हे सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर (Biggest Desk Calendar) असल्याचे '  लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 'च्या वतीने सुवर्णकन्या कु. रेवती रवि सोनार हिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

     सात फूट उंच आणि दहा फूट रुंद आकारात असलेले एकूण सत्तर चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे कॅलेंडर सात पृष्ठांचे असून पहिल्या पृष्ठावर वर्षभरातील बारा महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत. उर्वरित सहा पृष्ठांवर प्रत्येकी दोन महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत.शिवाय त्या सहा पृष्ठांवर सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि सोनार यांचे  'बहिण ' या विषयावरील  सुविचार  आहेत.

      एका लोखंडी फ्रेमवर हे भव्य डेस्क कॅलेंडर असून सर्व पृष्ठे महिन्यानुसार बदलणे शक्य आहेत. कु. रेवती सोनार हिच्याकडे असणाऱ्या या डेस्क कॅलेंडरमुळे सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर असे प्रमाणित करताना ' लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् ' ने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.

      यापूर्वी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद झालेल्या या डेस्क कॅलेंडरचे जगातील सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर म्हणून ' गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् ' या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेकॉर्ड बुक मध्येही नोंद व्हावी म्हणून सुवर्णकन्या कु. रेवती सोनार प्रयत्नशील आहे.
 
Top