खबरदारीच्या उपायासाठी नागरिकांनी मास्कऐवजी रुमाल वापरावा

मुंबई, दि. ४ - कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केले.

यासंदर्भात विधानपरिषदेत सदस्य प्रकाश गजभिये यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले की, राज्यशासनाने या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण तयारी केली आहे. आतापर्यंत मुंबईत आलेल्या ५५१ आंतरराष्ट्रीय विमानातील ६५ हजार १२१ प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले आहे. राज्यात बाधित देशातून ४०१ प्रवाशी आले असून आतापर्यंत १५२ प्रवाशांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची दोन वेळेस प्रयोगशाळा चाचणी केली. त्यापैकी १४९ लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी १४३ जणांना घरी सोडले आहे. सध्या सहा जण दाखल असून पुणे येथे दोन जण नायडू आणि मंगेशकर रुग्णालयात निरिक्षणा खाली आहेत. मुंबई येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत.

आता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात असून प्रत्येकाला स्वघोषणा पत्र देणे  सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रवाशाने कुठल्या देशातून प्रवास केला व कुठे जाणार आहे, संपर्क क्रमांक आदी माहिती देणे गरजेचे आहे.

  मुंबई येथे कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केयर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याच बरोबर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान दहा खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

  या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांची जाणीवजागृती करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत आहे.सध्या सोशल मीडियातून जो चुकीचा प्रचार केला जात आहे. तो रोखण्याकरिता सायबर क्राईमच्या अतिरिक्त महासंचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 कोरोनामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही, असे आश्वस्त करतानाचा सर्वांनी मिळून त्याचा मुकाबला करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

सुमारे तीन तास चाललेल्या चर्चेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदसय् सर्वश्री शरद रणपिसे, हेमंत टकले, महादेव जानकर,भाई जगताप,प्रशांत परिचारक,अनिकेत तटकरे, डॉ.रणजित पाटील,भाई गिरकर,विनायक मेटे, जोगेंद्र कवाडे, श्रीमती मनिषा कायंदे, विद्या चव्हाण, हुस्नबानो खलिफे आदींनी भाग घेतला.
 
Top