पंढरपूर ,२९/०३/२०२०- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत ग्रामीण भागात जीवनाश्यक सेवा सुरळीत रहावी. गावा तील गरजा गावांत भागविल्या जाव्यात  तसेच  परदेशाहून व परजिल्ह्यातून आलेल्या नागरीकांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी ग्रामसमितीमार्फत व्यवस्था केली जात आहे.गाव कोरोनामुक्त राहण्या साठी ग्रामसमिती सुरक्षा कवच असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

संचार बंदीच्या कालावधीत शहरी व ग्रामीण भागातील  जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी प्रांतधिकारी कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक इब्राहिम बोहरी, कवठेकर मॉलचे नाना कवठेकर यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते. 
          
  जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार व साठे बाजार होणार नाही यांची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. तालुक्यातील ग्रामस्तरीय समितीकडून गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीत काळजी घेण्यात येत आहे. ग्रामस्तरीय समितीमध्ये  सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष,ग्रामसेवक,  तलाठी, आरोग्य सेवक, स्थानिक पोलीस, आशा वर्कर यांचा समावेश असल्याचे प्रांतधिकारी ढोले यांनी सागितले. 

     परदेशाहून व परजिल्ह्यातून गावात आलेल्या प्रत्येक नागरीकांवर समितीकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. संबधित नागरीकांची दैनंदिन तपासणी केली जात आहे. आवश्यकता भासल्यास त्याला उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात येते. गावात अनावश्यक पेट्रोल डिझेलचा वापर होऊ नये यासाठी ग्रामस्तरीय समितीची शिफारस असल्याशिवाय पेट्रोल पंपावर इंधन विकत घेता येत नाही. गावांतील पाणीपुरवठा,दुध, भाजीपाला, किराणा माल उपलब्ध करण्याचे नियोजन ग्राम स्तरीय समितीकडून करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही याची दक्षता ग्रामसमिती घेत असल्याचे ही प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
             
  यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे म्हणाले, जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा करताना कोणतेही जादा दराने अथवा साठेबाजार करुन नये. अशा घटना घडल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा शेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्या साठी प्रशासन सज्ज आहे .
                                                                      00000000
 
Top