मुंबई - हवामान बदलाचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे वारंवार समोर येत असून करोना विषाणूच्या कहरामध्ये मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. या भागात दि.१६ मार्च, २०२० पासून सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वाऱ्यांसह गारपीट झाली. परळी तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार होत आहेत.विदर्भ आणि मराठवाडय़ात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडला आहे. अनेक भागात गारपीटही झाल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे .

बीड,उस्मानाबाद,परभणी,नांदेड,हिंगोली जिल्ह्य़ांत गारपीट झाली. एका बाजूला करोनाचे भय आणि दुसऱ्या बाजूला गारपिटीचा फटका, असे चित्र मराठवाडय़ात दिसून येत आहे.रबीच्या रूपाने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेले घास या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गेल्याचे दिसत आहे.काढलेले पीक वादळी वाऱ्यामुळे पाला पाचोळ्या सारखे उडून गेले आहे. त्यात पपई, केळी, द्राक्ष, आंबा, कांद्याच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

मराठवाड्यात जालना, नांदेड, बीड, लातूर, परभणी आणि हिंगोली तर पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, जळगाव, नंदूरबार, धुळे अकोला, बुलढाणा आणि वाशीम येथील रब्बी पिक मातीमोल झाले आहे.

खान्देशात गेल्यावर्षी देखील मे महिन्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे देखील झाले पंरतु मदत काही मिळाली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागले. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याला सहारा देण्याचा प्रयत्न केले असून त्यात यश आल्याचे समोर येत आहे.

नुकसानभरपाईचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले तरी मागील अनुदान अजून भेटलेले नाही त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा किती सक्षम आहेत हे लक्षात येते. जे अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत त्यांच्यावर कारवाई होणे या घटनेच्या माध्यमातून आवश्यक वाटते.

त्यामुळे या निवेदनाच्या माध्यमातून आपणास काही सूचना करत आहे त्यात कर्जमाफीप्रमाणे शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे नुकसानभरपाई मिळावी असे आवाहन विधान परिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांना केले आहे.
गारपिटीचा आणि अवकाळी पाऊस याबाबत प्रशासकीय यंत्रणेला माहिती पावसाच्या अगोदर प्राप्त होत असते.ही माहिती तात्काळ शेतकऱ्यां ना दवंडी, मोबाईल संदेश किंवा टेलिकॉलच्या माध्यमातून देण्यात यावी.

गतवर्षी झालेल्या गारपिटीचे नुकसानही लवकर मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी.

पीक विमा कंपनी ही शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरवात झाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे देखील पीक विमा कंपन्यांनी तात्काळ देण्याच्या सूचना द्याव्यात तसेच ज्या जिल्ह्यात पीक विमा कंपन्या नव्हत्या त्या शेतकऱ्यांना शासनाने निधी देण्याची तरतूद करावी.

 परळी तालुक्यात मांडेखेल येथे वीज पडून सुधाकर नागरगोजे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी. 

 नुकसान भरपाईचे पंचनामे पुढील पाच दिवसात अधिकाऱ्यांनी त्यांच्या शरीराची काळजी घेऊन पूर्ण करता येईल का याबाबत विचार करावा अशी विनंती उपसभापती विधानपरिषद,ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. 
 
Top