मुंबई ,दि.२०/०३/२०२० - कोरोना या विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु ही सुचविलेली संकल्पना स्वागतार्ह आहे. उद्याच्या रविवारी दि.२२ मार्चला सर्व देश वासीयांनी बाहेर न पडता घरातच थांबण्याचे आवाहन  केले आहे. यामुळे आपल्या देशात कोरोना विषाणूच्या साथीचा दुसरा टप्पा आहे. या पुढे तिसऱ्या टप्प्यात जाणे धोकादायक ठरेल. त्यामुळे पंतप्रधानांनी सुचविलेला घरीच थांबण्याचा जनता कर्फ्यु हा उपाय कोरोनाची लागण रोखण्या साठी रामबाण उपाय ठरेल. त्यामुळे सर्वांनी जनता कर्फ्युची अंमलबजावणी येत्या रविवारी करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे. 

कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगावर जगात अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही त्यामुळे या कोरोना विषाणू विरुद्ध जनजागृती आणि सावधानी घेणे;भीती न बाळगता काळजी घेणे आवश्यक आहे.गर्दीमुळे हस्त स्पर्शातून कोरोना मोठया प्रमाणात प्रसारित होतो. इटलीसारख्या देशात कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे त्या देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यापासून आपण धडा घेतला पाहिजे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्युला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे ना.रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 
     त्या दरम्यान सरकारी कर्मचारी,कामगार, अधिकारी कोरोना विरुद्ध राष्ट्ररक्षणाचे काम करणार आहेत. त्यांना रविवारी २२ मार्चला सायंकाळी ५.०० वाजता सायरन वाजल्यानंतर आहे तिथे टाळ्या वाजवून, थाळी नाद करून या राष्ट्ररक्षकांना धन्यवाद द्यायचे आहे. सर्वांनी एकजुटीने कोरोना विरुद्ध लढू या आणि जिंकू या असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे. 
 
Top