गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा- अलिबागच्या दिशेने निघालेली अजंठा कंपनीच्या मालकीची प्रवासी बोट शनिवारी सकाळी साडे दहा च्या सुमारास मांडवा जेट्टीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असताना ही बोट बुडाली.बोटीमध्ये एकूण ८८ प्रवासी प्रवास करत होते. 


बोटीतील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. जेट्टीजवळ पोहचत असताना अचानक ही बोट एका बाजूला कलंडली,बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे पोलिसांची पेट्रोलिंग बोट मदतीला धावून गेली, पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरून ८० प्रवाशांना सुखरूप जेट्टीवर पोहोचवण्यात आले.अन्य आठ जणांना स्पीड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर आणण्यात आले.
 अजंठा कंपनीची ही लाकडी बोट होती. या बोटीची वहनक्षमता ५० ते ६० आहे. शनिवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती,अचानक घडलेल्या या घटनेमुळे अजंठा बोटीतील प्रवासी हादरून गेले, सुदैवाने सागरी गस्तीवर असलेली पोलिसांची पेट्रोलिंग बोट आणि तिथे असलेले पोलीस नाईक प्रशांत घरत व सहकारी यांनी त्वरित बोटीजवळ पोहचून, सर्व ८८ प्रवाशांना पोलीस गस्तीवर असलेल्या नौकेतून जेट्टीवर सुखरूप पोहचवले.

अलिबाग तालुका पर्यटनाने समृद्ध आहे, येथील वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावर शनिवार- रविवार पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात, रस्त्याऐवजी सागरी मार्गाने वेळ वाचत असल्याने मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची पहिली पसंती बोटीच्या प्रवासाला असते.
 
Top